कोल्हापूर : महापालिकेची देय असलेली संपूर्ण घरफाळ्याची रक्कम ३० जून २०२१ पूर्वी भरल्यास एकूण बिलात सहा टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या सहाही नागरी सुविधा केंद्रावर मिळकतधारकांची गर्दी होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. यासाठी सर्व केंद्रे शनिवारी, रविवारी सुट्टी दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे, आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळकत कराची देयके अपलोड करण्यात आलेली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे प्रिटिंगसाठी कागद वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि छपाईस विलंब होत असल्याने करदात्यांना वेळेत घरपोच बिले उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटवर आपला करदाता क्रमांक टाकून बिल पाहावे. नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांनी मागील वर्षाचे प्राप्त बिल सोबत नागरी सुविधा केंद्रात आणावे. आपला करदाता क्रमांक सांगितल्यास तत्काळ आपल्याला आपला चालू वर्षाची घरफाळ्याची रक्कम समजू शकेल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करून आपला घरफाळा भरावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
चौकट
३ कोटी ८८ लाख जमा
सर्व नागरी सुविधा केंद्रमध्ये २ कोटी ९२ लाख ६४ हजार ७० तर ऑनलाइन ९५ लाख ८७ हजार ५४७ असे एकूण ३ कोटी ८८ लाख ५१ हजार ६१७ रुपये घरफाळ्याची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली. सवलत योजना ३० जूनपर्यंत असल्याने पुन्हा तिजोरीत घरफाळ्याच्या रकमेची भर पडणार आहे.