गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक प्रचार सांगता सभेत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, २२ मार्च रोजी न्यायमूर्ती रजेवर गेल्याने ती तारीख एप्रिलमध्ये आहे. त्याचा निकाल लागला असता तर ते जेलमध्ये असते, असे उद्गार काढून माझी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दोन कोटींच्या बदनामीचा फौजदारी दावा दाखल करणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देतानाच ‘मला जेलमध्ये घालणारा अजून जन्माला आलेला नाही’, असा टोमणाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील श्री. काळभैरी शेतकरी पॅनेलच्या प्रचार सांगता सभेत मंत्री पाटील यांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यास पत्रकातून मुश्रीफ यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. आमदार मुश्रीफ यांनी म्हटले आहे, कायदा फक्त अपात्रतेचा असून, सहकारमंत्री दिशाभूल करून गैरसमज पसरवीत आहेत. सार्वजनिक जीवनात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र, मला जेलमध्ये घालविणाऱ्याचा अजूनही पृथ्वीतलावर जन्म झालेला नाही. मी फार कष्टातून व प्रयत्नांतून जनमाणसामध्ये माझी प्रतिमा तयार केली आहे. कोणीही उठावे व त्यावर चिखलफेक करावी हे सहन करणे या जन्मामध्ये शक्य नाही. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; परंतु बदनामी करणाऱ्यास मी धडा शिकवीत आलो आहे. आपण कायमपणे सत्तेमध्ये राहू हा भ्रम सहकारमंत्र्यांनी आपल्या मनातून काढून टाकावा. मंत्रिपदाची शक्ती चांगल्या व विधायक कामासाठी लोकांनी नाव काढावे अशासाठी वापरावी. तुम्हीच दक्ष रहा. कारण बांधकाम मंत्र्यांवर ईडीची व ए.सी.बी.ची नजर असते. नाहीतर स्वत: आत जाऊन बसाल, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला आहे. तुमच्या सहीपेक्षा पैशाची आवश्यकता गडहिंग्लज कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी तुमच्या सहीच्या आवश्यकतेपेक्षा पैशाची आवश्यकता जादा आहे. स्वत:च्या हिमतीवर विस्तारीकरण करणार असतील तर तुमच्या परवानगीची आवश्यकता नाही. कृपया, अज्ञान प्रगट करू नका, असा सल्लाही मुश्रीफ यांनी पत्रकातून दिला आहे.(प्रतिनिधी)
चंद्रकांतदादांवर दोन कोटींचा दावा करणार
By admin | Published: March 27, 2016 1:07 AM