कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश अशा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये सोमवारी येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयासमोर फ्री स्टाइल हाणामारी झाली. गावचे सरपंच विजय गुरव यांना यावेळी धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला; परंतु याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सरपंच गुरव यांच्याशी संपर्क साधला; परंतु तो होऊ शकला नाही. समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी दोन मिनिटांत फोन करतो असे सांगितले; परंतु त्यांनी नंतर संपर्क साधला नाही.देवस्थानचे कार्याध्यक्ष असलेले राजाराम मगदूम यांचे निधन झाल्यामुळे नवीन कार्याध्यक्ष निवड करण्यावरून मतप्रवाह निर्माण झाल्याने ट्रस्टीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. धर्मादाय कार्यालयाजवळ दोन्ही गटांत हाणामारी झाल्याने हा वाद अधिकच चिघळला.कार्याध्यक्ष मगदूम यांचे निधन झाल्यानंतर गेले महिनाभर ट्रस्टची कागदपत्रे मिळत नसल्याने देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणेकरी यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यातून या वादाला तोंड फुटले. दोन्ही गट सोमवारी धर्मादाय उपायुक्त कार्यालयात निवेदन द्यायला आले होते. त्यावेळी सुरुवातीला एकमेकांना जाब विचारण्यातून वादाला सुरुवात झाली.
सरपंच गुरव हे पदसिद्ध विश्वस्त आहेत; परंतु ते देवस्थान समितीत जास्त हस्तक्षेप करत असल्याची तक्रार आहे. तुम्हीच फक्त ट्रस्टी नाही आम्ही कोणी नाही का, असे गुरव यांचे म्हणणे होते. दिवंगत मगदूम हे कार्याध्यक्ष होते. त्यामुळे कागदपत्रे त्यांच्याच ताब्यात होती. तसा देवस्थानचा पोटनियम आहे. मग तुम्हाला ती कशाला हवीत, असे समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यातून हा वाद वाढत गेला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची घटना घडली. भर रस्त्यावर सुरू असलेल्या या वादात नेमके काय चाललंय हे कुणालाच कळत नव्हते.
कार्याध्यक्ष निवड आज..देवस्थान ट्रस्ट स्थापन होऊन अनेक वर्षे झाली. त्यामध्ये मंदिर परिसराची सर्व जमीन येथील भोसले सरकार यांची असल्याने धैर्यशील भोसले त्यांना अध्यक्षपदावर, तर बाळूमामाचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे बापूसो मगदूम यांचे चिरंजीव रामभाऊ मगदूम हे कार्याध्यक्ष होते. सर्व मानपान अध्यक्षांना, तर आर्थिक व्यवहार कार्याध्यक्ष मगदूम हे पाहत होते. ट्रस्टी म्हणून कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील १३ जण आहेत. त्यातून आज मंगळवारी कार्याध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.
उत्पन्न वाढले तसे वादही..
सन २००३ नंतर खऱ्या अर्थाने बाळूमामा मंदिराकडे भक्तांचा ओढा वाढला. उत्पन्नातही प्रचंड वाढ झाली, तशा अनेकांच्या नजरा या मंदिर ट्रस्टीमध्ये घुसण्यासाठी लागल्या. त्यातूनच ग्रामपंचायत व ट्रस्टी असाही वाद सुरू झाला. गावातील राजकीय नेते मंडळी आणि ग्रामपंचायत ट्रस्टी यांच्यात वादविवाद झाले. मध्यंतरीच्या काळात पोलिस तक्रारी झाल्या आणि मारहाणीचे गुन्हेसुद्धा दाखल झाले.
पोलिस बंदोबस्ताची मागणी करा : जिल्हाधिकारी
आदमापूर येथील सरपंच, संत बाळूमामा देवस्थानचे ट्रस्टी व ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन ट्रस्टींना संरक्षण मिळावे व कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आपण लक्ष घालावे, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘समोरच्या व्यक्तींनी हुल्लडबाजी केली तरी तुम्ही असे वागू नका. स्वत: कायदा, सुव्यवस्थेने काम करा. गरज वाटली व पोलिस बंदोबस्त हवा असेल तर तशी रितसर मागणी करा.’
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादट्रस्टचे विश्वस्त दिलीप चंद्रकांत पाटील (वय ३५, रा. आदमापूर, ता. भुदरगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच विजय विलास गुरव, लक्ष्मण गणपती पाटील (दोघे रा. आदमापूर) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. सरपंच गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धैर्यशील शिवाजीराव पाटील, दिलीप चंद्रकांत पाटील, यशवंत सखाराम पाटील आणि पांडुरंग सदाशिव पाटील (सर्व रा. आदमापूर) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.