कळे : कळे परिसरातील एका विद्यामंदिरात दोघा शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या खोलीत एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत झालेली मारामारी चर्चेचा विषय ठरली आहे. वादाची माहिती समजताच, संस्थेने संबंधित शिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले.येथील एका माध्यमिक शाळेत इयत्ता आठवी ते दहावी वर्गांसाठी इंग्रजी व हिंदी-संस्कृत विषय शिकविणाऱ्या दोन शिक्षकांमध्ये वाद झाला. त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून धुसफुस सुरू होती. दुपारी विद्यार्थ्यांसमोर शिकविताना वर्गात वाद झाला होता. जेवणाच्या सुट्टीत इंग्रजी शिकविणारे संबंधित शिक्षक तक्रार घेऊन मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले. मुख्याध्यापकांनी वाद झालेल्या दुसऱ्या शिक्षकाला कार्यालयात बोलावून घेतले. दरम्यान, दोघा शिक्षकांमध्ये मुख्याध्यापकांसमोर पुन्हा वाद वाढला. त्यांनी शिवीगाळ करून एकमेकांची कपडे फाडली. मारामारीचा हा प्रकार पाहून मुख्याध्यापकांचा रक्तदाब वाढला. त्यांना काही सुचेनासे होऊन अस्वस्थ वाटू लागले. एका शिपायाने मध्यस्थी करून वाद मिटविला.स्कूल बसचा मेंटेनन्स, डिझेल खर्च, चालकाचा पगार यांसह शालेय खर्चासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचारी आपल्या वेतनातील काही रक्कम महिन्याला शाळेत जमा करतात.प्रत्येक शिक्षकावर प्रतिमहा तीन हजार रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर प्रतिमहा दीड हजार रुपये अशी रक्कम त्यांच्या वेतनातून वर्गणी स्वरूपात जमा केली जाते. इंग्रजी शिकविणाऱ्या त्या शिक्षकाकडे हिशेबाची जबाबदारी आहे. या हिशेबावरून वाद झाला असल्याचे सांगितले जाते.
Kolhapur: शाळेत शिक्षकांमध्ये हाणामारी, संस्थेने संबंधित शिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:42 AM