गणपती कोळी कुरुंदवाड: शिरढोण (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीने गावात दारुबंदीचा ठराव कायम करण्याच्या विषयांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन गटात धक्काबुक्कीसह हाणामारीचा प्रकार झाला. गोंधळात प्रोसिंडींगही फाडण्यात आली. अखेर गावात दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा बहुमताने ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच बाबासो हेरवाडे होते.२०१६ साली गावात महिला ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. गावात दोन व्यावसायिकांनी बिअरबारसाठी परवाना मागितल्याने सदस्यांनीच याला विरोध केल्याने महिला ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर विषय घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते. यासाठी आज, सोमवारी ग्रामपंचायतीसमोर महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी काही महिलांनी विरोध केल्याने शाब्दिक वादावादीतून धक्काबुक्की करत हाणामारी सुरू झाली.सरपंच हेरवाडे यांनी शांततेते आवाहन केले. मात्र गोंधळात पुरुषांनी भाग घेतल्याने वाद अधिकच पेटला. काहीवेळात कुरुंदवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुरुषांना सभेपासून बाजूल हाकलून सभेला सुरवात झाली. सरपंच हेरवाडे यांनी गावातील दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा विषय वाचताच बहुतांश महीलांनी हात वर करून मंजुरी दिली.
Kolhapur: दारुबंदी ठरावावरुन शिरढोणमध्ये गावसभेत दोन गटात हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 5:45 PM