हातकणंगले : माणगाव, ता. हातकणंगले येथे मोबाइलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन दोन्ही गटांनी एकमेकावर प्रचंड दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्या युवकावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोन समाजाच्या ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसानी १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता सर्वाना १५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.घटनास्थळ आणि हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यानचा एक व्हिडीओ मराठा समाजातील युवकाने स्टेटस ठेवला होता. या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली. एका समुदायाने सुदेश माने या युवकाला दारात जाऊन मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून मारहाण करून पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह हातकणंगले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.हातकणंगले पोलिस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन बाजूंच्या युवकांना समजावून सांगत वाद मिटवला. मात्र काही हुल्लडबाज युवकांनी एकमेकाच्या अंगावर धावून जात दगडफेक सुरू केली. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत सर्वांना पिटाळून लावले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.हातकणंगले पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी योगेश कोठावळे, विश्वनाथ कांबळे, दिग्विजय कांबळे, अमर कांबळे, अलोक राजमाने, दादा भोसले, युवराज कोळी, दशरथ मेडशिंगे, सदाशिव माने, रतन वडर, करण वडर, भूषण चव्हाण या संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Kolhapur: माणगावमध्ये मोबाइल स्टेटसवरून दोन गटांत हाणामारी, ३० जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:28 PM