सरवडे : राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरुस्तीच्या विषयावरून मंजूर, नामंजूर अशा घोषणा देत जोरदार हाणामारी झाली. कोण कोणाला मारते हे कळत नव्हते .खुर्च्यांची व चप्पल फेकून मारली. मंजूर -नामंजूर असा आवाज आणि फक्त गोंधळच ऐकायला येत होता. यामध्ये काही महिलांना धक्का बुक्की झाली. अशा गोंधळात शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ अशा नामकरणास सभासदांनी मंजुरी दिली. या विषयासह विषय पत्रिकेतील सर्व मंजूर झाल्याचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे जाहीर केले. माजी अध्यक्ष व संचालक वसंतराव पाटील यांनी संघाच्या संस्थापक मंडळाच्या यादीत शिवाजीराव खोराटे यांचे नाव नसताना त्यांच्या नावाचा अट्टहास का ?.शिवशंकर असे नाव द्यावे अशी मागणी ५२ गावच्या सभासदांनी केली आहे. खोराटे समर्थक यांनी केलेल्या मारहाणीचा व ठरावाला आम्ही विरोध करून निषेध करतो असे सांगितले.संघाची वार्षिक संघाची ६९ वी वार्षिक सभा खोराटे विद्यालयात झाली. विठ्ठलराव खोराटे अध्यक्षस्थानी होते. सभा दोन वाजता सुरू झाली. विषय पत्रिकेवरून १ ते ६ विषय वाचन सुरू झाले. त्यानंतर ७ नंबरचा विषय राधानगरी तालुका संघाच्या नामविस्ताराचा होता. त्यास अभिजित पाटील यांनी विरोध करून ठराव नामंजूरची घोषणा दिली. त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. मंजूर नामंजूरचा गदारोळ सुरू झाला. खोराटे समर्थक पाटील यांच्या अंगावर धावले. तसे वसंतराव पाटील समर्थकही पुढे सरसावले तसा मोठा गोंधळ थेट व्यासपीठावर गेला व दोन्ही समर्थकांत तुंबळ राडा झाला.
संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे म्हणाले, गतवर्षीच्या सभेत शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी संघ अशा नामकरणावर चर्चा झाली होती. त्यास मंजुरी देण्यासाठी हा विषय ठेवण्यात आला होता. या विषयासह विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. सभेत वसंतराव पाटील व त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालत सभेला गालबोट लावले त्याचा मी निषेध करतो.विरोधी संचालक वसंतराव पाटील म्हणाले , संघ स्थापनेच्या संस्थापक संचालक मंडळात शिवाजीराव खोराटे यांचे कुठेही नाव नाही. तरीही खोराटे यांच्या नावास आमचा विरोध नाही, मात्र संघाच्या विकासात माजी आमदार दिवंगत शंकर धोंडी पाटील यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे संघाला शिवशंकर राधानगरी तालुका शेतकरी संघ असे नाव द्यावे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी ५२ गावांतील सभासदांनी संघाकडे मागणी केली ती सत्तारूढ गटाने धुडकावली. ही मागणी हुकूमशाही पद्धतीने डावलली असून आमच्या मंडळींना खोराटे समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करतो. यावेळी उपाध्यक्षा आनंदी पाटील, संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तात्काळ पोलिस दाखलसभेला अगोदर पोलिस उपस्थित नव्हते. हाणामारी झाल्याचे समजताच पोलिस निरीक्षक संतोष गोरे व सहकारी यांनी तात्काळ भेट दिली. दोन्ही गटाशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती घेतली. मात्र पोलिस ठाण्यात कोणताच गुन्हा नोंद नाही.