कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा ९६.७३ टक्के निकाल लागला असून, विभागाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याची माहिती शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष महेश चोथे यांनी शुक्रवारी दिली. गतवर्षीपेक्षा यंदा १.७७ टक्क्यांनी विभागाचा निकाल घटला.२ मार्च ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाने राज्यात बाजी मारली. कोल्हापूर विभागात २३१६ शाळांमधील ३५५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागातील एक लाख २८ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक लाख २४ हजार ३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गतवर्षी विभागाचा निकाल ९८.५० टक्के लागला होता. यंदा यात घट झाली. दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, जिल्ह्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला. सातारा जिल्हा द्वितीय स्थानी राहिला असून, त्यांचा निकाल ९६.७२ टक्के लागला. सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.८ टक्के लागला.
कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी उत्तीर्णकोल्हापूर जिल्ह्यातून ५२ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ५१ हजार ४५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या ३७ हजार ८११ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ५७४ विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत यश मिळवता आले. सांगली जिल्ह्यातील ३७ हजार ७६६ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गुणपत्रिका १४ जूनलानिकालानंतर गुणपडताळणी, निकालाच्या छायांकित प्रती यासाठी ३ जून ते १२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. गुणपडताळणी अर्जासाठी प्रतिविषय ५० रुपये शुल्क आहे. छायांकित प्रतीसाठी ३ जून ते २२ जून या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. दरम्यान, १४ जूनला संबंधित शाळांमध्ये गुणपत्रिका देण्यात येणार आहेत.
सर्व प्रकिया पारदर्शक
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविले गेले. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला कॉपीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. सहायक परीरक्षक (रनर) यांनी प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ती केंद्रावर पोहोचेपर्यंत त्यांचे चित्रीकरण करण्यात आले. ही सर्व प्रकिया पारदर्शकपणे राबविली गेली. यामुळे निकालात काही अंशी घट झाली. विशेष म्हणजे हे कॉपीमुक्त अभियान राबविण्याची संकल्पना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागाचे अधीक्षक दीपक पवार यांनी मंडळाला सुचविली होती. मंडळानेही ती स्वीकारत राज्यभर राबविली.