आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पात्र कर्जमाफीतील शंभर कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष अन्वर जमादार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जिल्हा बॅँकेने शेतकरी व विकास संस्थांच्या माध्यमातून नाबार्ड कडे मागणी न करता बॅँकेने मागणी केले तरच कायदेशीररित्या पैसे लवकर मिळू शकतील, अशी मागणीही बॅँकेकडे केल्याचे जमादार यांनी पत्रकात म्हटले आहे.
केंद्र सरकारने २००८ मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली पण कोल्हापूरातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांचे ११२ कोटी ८९ लाख रूपये अपात्र ठरविले. नाबार्डच्या वसुलीच्या परिपत्रकाला पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शेतकऱ्यांवरील अन्याय न्यायव्यवस्थेच्या निदर्शनास आणून दिला. गेले पाच-सहा वर्षे विविध संस्थांनी न्यायालयीन पातळीवर संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला.
दरम्यान, अपात्र रक्कमेबाबत उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल देत रक्कम पात्र ठरविली होती. पात्र रक्कम परत मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्याला पैसे मागण्याचा अधिकार नसून बॅँकेने पैसे मागितले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. आता जिल्हा बॅँकेने शेतकरी व विकास संस्थांना ठराव व्याजासह पात्र रक्कम मागणी करण्यास सांगितले आहे. हे चूकीचे असून उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार बॅँकेने याबाबतची मागणी केली तरच शेतकऱ्यांच्या हातात लवकर पैसे मिळू शकतात.
यापुर्वीच ११२ कोटी ८९ लाखा पैकी ११ कोटी ९९ लाख रूपये अपात्र ठरविल्याने बॅँकेने मागणी करताना १०० कोटी ९० लाखाची करणे अपेक्षित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे अन्वर जमादार यांनी पत्रकात म्हटले आहे.