कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत गणित भाग दोन (भूमिती) या विषयाचा पेपर झाला. त्या दरम्यान कॉपी करताना कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण ११ परीक्षार्थी सापडले. त्यातील सर्वाधिक सात परीक्षार्थी हे नांदणी (ता. शिरोळ) या केंद्रावरील आहेत.नांदणी येथील केंद्रावर विशेष महिला भरारी पथकाने सात परीक्षार्थींना कॉपी करताना पकडले. या पथकाने जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली.
मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) केंद्रावर विस्तारअधिकाऱ्यांच्या भरारी पथकाला तीन परीक्षार्थींना, तर कोल्हापूर शहरातील वि. स. खांडेकर प्रशाला केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने एका परीक्षार्थीला कॉपी करताना पकडले.
या पथकांच्या कारवाईमध्ये सापडलेल्या परीक्षार्थींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सहसचिव टी. एल. मोळे यांनी दिली.