इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई, पुणे, सांगली व कोकण भागातील संघांनी वेगवेगळ्या आशयाच्या एकांकिका सादर केल्या. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लबच्यावतीने या स्पर्धा सुरू आहेत. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धा पाहण्यासाठी रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.पहिल्या सत्रात अवनि थिएटर्स मिरज या संघाने ‘मैत्रिण’ ही संदीप सुर्वे लिखित व अमोल भोजणे दिग्दर्शित एकांकिका सादर केली. एक विवाहित लेखक एका मुलीशी आॅनलाईन मैत्री करतो; पण ते त्याचे दिवास्वप्न असते, असा त्या एकांकिकेचा आशय होता. त्यानंतर रंगवलय फौंडेशन मुंबई निर्मित ‘गांधीला बॉडी पाहिजे, देता का?’ ही एकांकिका रसिकांना प्रभावित केली. समर्थ कलाविष्कार देवगड या संघाने ‘दहा वाजून दहा मिनिटे’ ही एकांकिका सादर केली. व्हॉटस्अॅप, सोशल मीडियाचे दुष्परिणाम या एकांकिकेतून परिणामकारकपणे समोर आले. कराडच्या मनोरंजन संस्थेने ‘तुका म्हणे अवघे सोंग’ ही एकांकिका सादर केली. सांगलीच्या भगवती क्रिएशन संस्थेने ‘अजूनही चांदरात आहे’ ही एक गंभीर विषयावरील एकांकिका सादर करून रसिकांची मने जिंकली. कॉर्पोरेट जगतात काम करणारे जोडपे, उपभोगवादी जीवनशैलीमुळे बॉससमोर त्या जोडप्याची असहायता; पण शेवटी त्यांनी दिलेला नकार अशी ही एकांकिका होती. त्यानंतर आमचे आम्ही, पुणे संघाने ‘लेखकाचा कुत्रा’ ही एकांकिका सादर केली. एक प्रतिभावंत नाटककार दूरदर्शनच्या मालिका लेखनाकडे वळतो. त्यामुळे उत्तम नाटके लिहिण्याचे बंद करतो; पण त्याच्या शिष्याला हे बरे वाटत नाही आणि तो नाटककारांशी बोलून त्याचे मन वळवतो. कोल्हापूरच्या विजयश्री संस्थेने सुहास भोळे लिखित व विजय कुलकर्णी दिग्दर्शित ‘वात्सल्य’ ही भावस्पर्शी एकांकिका सादर केली. मतिमंद मुलाचा सांभाळ करताना आईची होणारी तगमग या एकांकिकेत दाखविली आहे. आशिष पाथरे यांनी लिहिलेली ‘लव्ह’ ही धमाल एकांकिका सादर करून सिद्धांत थिएटर्स कुडाळच्या संघाने रसिकांची दाद मिळवली. ‘अंतरंग’ ही एकांकिका पुण्याच्या भरत नाट्य संशोधन संस्थेने सादर केली. एक आईच आपल्या मुलीशी नेहमी स्पर्धा करते व यश मिळवते; पण अंतरंगातून त्या मुलीची काळजीही करते, अशा प्रकारची ही एकांकिका आहे. (वार्ताहर)
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत दर्जेदार नाट्याविष्कार
By admin | Published: February 17, 2016 12:08 AM