राजाराम लोंढे - कोल्हापूर गेली दोन वर्षे केलेली निवडणुकीची तयारी, पॅनेल बांधणीत रवींद्र पंदारे यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व विरोधकांचा हट्ट या सर्वांमुळे राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेत विरोधकांना ‘क्लीन बोल्ड’ करण्यात सत्तारूढ गट यशस्वी झाला. पण विरोधकांच्या मतांची विभागणी होऊन त्यांनी दिलेली झुंज सत्तारूढ गटाला आत्मचिंतन करायला लावणारी असून पुढे पाच वर्षांतील चुका सुधारत कामकाज करावे लागणार आहे. सात जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेची निवडणूक नेहमीच अटीतटीची होते. गेल्यावेळेला सभासदांनी तिन्ही पॅनेलला संमिश्र पाठबळ दिले होते. निवडणुकीनंतर विरोधकांनी एकत्रित येत मोट बांधून पाच वर्षे सत्तारूढ गटाला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बँकेची निवडणूक राजन देसाई, बाळासाहेब घुणकीकर व विश्वास माने यांनी एकत्र येऊन लढविण्याचा निर्णयही झाला होता. हे तिन्ही नेते एकसंधपणे निवडणुकीला सामोरे गेले असते तर काही जागांचा निकाल वेगळा दिसला असता, पण दोन-तीन वर्षे एकत्रीकरणाचे सुरू असलेले गुऱ्हाळ ऐन निवडणुकीच्या तोंडावर थंडावले. नवीन व जुन्यांना किती संधी द्यायची; यावरून माने व देसाई यांचे फिसकटले. शेवटपर्यंत प्रयत्न झाले तरी युती होत नाही म्हटल्यावर विश्वास माने यांनी घाईगडबडीने पॅनेलची घोषणा केली. त्यामुळे माने यांना सर्व विभागांना सामावून घेता आले नाही. परिणामी, त्यांचे बहुतांशी उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. राजन देसाई, राजेंद्र पाटील व बाळासाहेब घुणकीकर यांनी ताकदीने प्रचार यंत्रणा राबविली. सत्ताधाऱ्यांचे कच्चे दुवे शोधून त्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. घुणकीकर व राजन देसाई यांनी निकराची झुंज दिली. पण रवींद्र पंदारे यांनी विरोधक एकवटणार हे लक्षात घेऊनच निवडणुकीची बांधणी सुरू केली होती. पॅनेलमध्ये सर्वच विभागांना संधी देत असताना त्याच ताकदीचे उमेदवार सभासदांसमोर आणले. माघारीची वाट न पाहता पॅनेल ठरवून प्रचाराला सर्वप्रथम सुरुवात केल्याने ते जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचू शकले. परजिल्ह्यांतील सभासदांपर्यंत पोहोचणे व त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी ज्या खुबी वापरल्या त्या निश्चितच विरोधकांना विचार करायला लावणाऱ्या होत्या. एकंदरीत पंदारे यांनी केलेली बांधणी, विरोधकांचा जागावाटपातील हट्ट सत्तारूढ गटाच्या पथ्यावर पडला असून रवींद्र पंदारे यांनी पॅनेल बांधणीसह एकूणच प्रचारयंत्रणेत दाखविलेल्या मुत्सद्देगिरीने विरोधक मात्र ‘क्लीन बोल्ड’ झाले हे नक्की.
पंदारेंच्या मुत्सद्देगिरीने विरोधक ‘क्लीन बोल्ड’
By admin | Published: March 25, 2015 11:44 PM