कोल्हापूर : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई करावी, अशा मागणीचे निवेदन माजी महापौर अश्विनी रामाणे यांनी गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले. प्रशासक बलकवडे यांनी निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात बैठक लावण्याच्या सूचना दिल्या.
पावसाळ्यात कोल्हापूर शहरात एन. टी. सरनाईकनगर, योगेश्वर कॉलनी, जगताप नगर, ज्योतिर्लिंग कॉलनी, रामानंदनगर, जरगनगर, सुतारवाडा, रायगड कॉलनी अशा अनेक कॉलनीतून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरत असते. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन प्रापंचिक साहित्याचे व घरांचे नुकसान होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी किमान दोन महिने अगोदर शहरातील जयंती, दुधाळी नाल्यासह सर्वच नाल्यांची सफाई होणे आवश्यक आहे, असे रामाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
वळवाचा पाऊस पडल्यावर नाले सफाई करण्यास गेल्यावर दलदल निर्माण होऊन नाले नीट सफाई होत नाहीत. या कामात मोठे अडथळे येतात. या कामासाठी भाडेतत्त्वावर वाहने घ्यावी लागतात. त्यामुळे जर तयारी वेळेत सुरू झाली नाही, तर नाले सफाई होणार नाही. अद्याप महापालिका प्रशासनाने नाले सफाईबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, याकडेही रामाणे यांनी प्रशासकांचे लक्ष वेधले आहे.