कोल्हापूर : जयंती नाल्याला पुन्हा नदीचे पूर्ववत रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच्छ-सुंदर-निरोगी कोल्हापूर’ या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला.
रामानंदनगरपासून खानविलकर पेट्रोल पंपानजीक पंप हाऊस ते सिद्धार्थनगरपर्यंतच्या नाल्यातील व काठांवरील कचरा, प्लास्टिक, खुरट्या वनस्पती काढून नाल्याचे पाणी प्रवाहित केले. त्यामुळे नाल्याने आज मोकळा श्वास घेतला. जयंती नदीच्या इतिहासात अशा पद्धतीने व्यापक मोहीम प्रथमच राबविली. तिला प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळाला.एकेकाळी धार्मिक अधिष्ठान लाभलेली जयंती नदी आणि सद्य:स्थितीत फक्त लोकप्रतिनिधींच्या उदासीनता, दुर्लक्ष, अतिक्रमणामुळे नदीचे स्वरूप मोठ्या नाल्यात झाले. पावसाळ्यापूर्वी यंदा महानगरपालिकेमार्फत लोकसहभागातून नालेसफाई म्हणजेच नाल्याला नदीचे पूर्ववत स्वरूप प्राप्त करून देण्याची संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हाती घेतली.रामानंदनगर, हॉकी स्टेडिअम, सावित्रीबाई फुले रुग्णालय, लक्ष्मीपुरी, आयर्विन ब्रिज ते खानविलकर पेट्रोलपंपानजीक पंप हाऊसपर्यंत या जयंती नाल्याच्या दोन्ही काठांवरील कचरा, प्लास्टिक, पाण्यातील गाळ काढून हे पाणी प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे रविवारी सकाळी यंत्रणा कामाला लागली. महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत हॉकी स्टेडियमनजीक सकाळी मोहिमेचा प्रारंभ झाला. दुपारपर्यंत ही मोहीम सुरूच होती. यातून हा नाला सफाई होऊन त्याने मोकळा श्वास घेतला.
नियंत्रित पाच पथकेहॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुग्णालय ते लक्ष्मीपुरी, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या पद्धतीने पाच विभाग पाच नियंत्रण पथके तयार करून ही मोहीम लोकसहभागातून राबविली.
विविध संघटनांचा सहभागमहापालिकेचे सर्व विभाग, शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी कॉलेज, व्हाईट आर्मी, पाचगावचा शिवबा मराठा मावळा गु्रप, फेरीवाला संघटना, निसर्गमित्र संघटना, वृक्षप्रेमी ग्रुप, आदी संघटनांचा यात सहभाग होता.
क्रिडाई कोल्हापूर, आर्किटेक्ट असोसिएशनचे योगदानक्रिडाई कोल्हापूरने दोन पोकलॅन मशीन देऊन या मोहिमेला हातभार लावला. त्यांचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रवी माने, प्रदीप भारमल, विश्वजित जाधव, महेश पवार, संदीप मिरजकर, गणेश सावंत, विलास तहसीलदार यांच्यासह कार्यालयीन स्टाफ, कामावरील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. आर्किटेक्ट असोसिएशनेच अध्यक्ष अजय कोराणे, विजय चोपदार, उमेश कुंभार, अनिल घाटगे, प्रशांत काटे, वंदना पुष्कर, प्रमोद पोवार यांचेही योगदान लाभले.
सहभागाने लक्ष वेधलेआयुक्त डॉ. कलशेट्टी हे पत्नीसह, तर महापौर सरिता मोरे ह्या पती माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यासह सहभागी झाल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, संयोगिताराजे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, दिलीप देसाई, अशोक रोकडे यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
यंत्रणा सरसावलीनाल्यातील दूषित पाण्यात उतरून कर्मचाऱ्यांनी गाळ काढला. काठावरील प्लास्टिकच्या पिशव्या-बाटल्या, काचेच्या बाटल्या, कचरा, खुरटी झाडे, आदी काढले. पाच जेसीबी, चार पोकलॅन, १० डंपरद्वारे एकूण ७० टन कचरा उठाव केला. कचरा उठाव करतानाच प्लास्टिक स्वतंत्र केले.
नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभागभाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, राजाराम गायकवाड, शेखर कुसाळे, ईश्वर परमार, ललिता बारामते, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, माधुरी लाड, नियाज खान, दिलीप पोवार, संजय मोहिते या नगरसेवकांसह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, समीर व्याघ्रांबरे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आफळे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, अग्निशमन दलाचे प्रमुख रणजित चिले, आदी अधिकाऱ्यांसह आरोग्य, बागा, सार्वजनिक बांधकाम, घरफाळा, अग्निशमन, नगरसचिव, प्राथमिक शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा, ड्रेनेज प्रकल्प, कार्यकारी अभियंता, वर्कशॉपमधील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभाग नोंदविला.
कचरा व पाण्याविषयी शहरवासीयांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, याच उद्देशाने जयंती नाला स्वच्छता मोहीम ही लोकसहभागातून राबविली. यातून नागरिकांना घरगुती कचरा ओला व सुका स्वतंत्रपणे जमा करण्याची सवय लागावी हाच उद्देश आहे.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महापालिका
- महापालिकेच्या मोहिमेत उत्साहाने लोकसहभाग
- पुन्हा कचरा नाल्यात टाकल्यास दंड
- सफाईत ७० टन कचरा जमा
- जमा कचऱ्यांतून वीजनिर्मिती व उत्तम आरडीएम निर्मिती