सांगली : हॉटेल व्यवसायासाठी ना हरकतचा दाखला देऊन कोणतीही कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना महापालिकेच्या कुपवाड आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकास अटक करण्यात आली आहे. अविनाश दिनकर पाटणकर (वय ५०, रा. वृंदावन कॉलनी, विश्रामबाग) असे त्याचे नाव आहे. विश्रामबाग येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी साडेचार वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.तक्रारदाराचे विश्रामबागच्या पोलीस वसाहतीजवळ हॉटेल आहे. या हॉटेल मालकास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ना हरकत दाखला हवा होता. यासाठी त्यांनी पालिकेच्या कुपवाड येथील आरोग्य विभागात अर्ज केला होता. दाखला देण्याचे काम पाटणकर याच्याकडे होते. त्याने यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिल्याशिवाय दाखला मिळणार नाही, असे सांगितले. शेवटी चर्चेअंती मालकाने १५ हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली असता, यामध्ये पाटणकरने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मालकाने लाचेची रक्कम सोमवारी विश्रामबागमधील दुसऱ्या हॉटेलमध्ये देतो, असे सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत विभागाने हॉटेलमध्ये सापळा लावला होता. दुपारी साडेचार वाजता हॉटेल मालकाकडून १५ हजारांची लाच घेताना पाटणकर याला रंगेहात पकडले. या कारवाईने त्याला घाम फुटला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास बुधवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)घरावर छापापाटणकर याच्या विश्रामबाग येथील वृंदावन कॉलनीतील घरावरही ‘लाचलुचपत’ने छापा टाकून झडती घेतली. मात्र, काहीच आढळले नाही. बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांना याचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी सांगितले. वर्षात दुसरी घटनागेल्या वर्षभरात लाचलुचपतच्या जाळ्यात महापालिकेचे अधिकारी सापडण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना लाच घेताना पकडले होते. आरोग्य विभागातील पाटणकरही लाच घेताना सापडल्याने या विभागाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे.
स्वच्छता निरीक्षकास लाच घेताना अटक
By admin | Published: May 19, 2015 11:55 PM