कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारीला वेग आला आहे. गुरुवारपासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला असून मुंबईतील आय स्मार्ट फॅसिटिक कंपनीच्यावतीने मंदिरासाठी ही मोफत सेवा दिली जाते. श्री अंबाबाई मंदिराचा शारदीय नवरात्रौत्सव देशभरात प्रसिद्ध असून या दहा दिवसात लाखो भाविक मंदिराला भेट देतात. देवीचे नित्यनैमित्तीक धार्मिक विधी, रोज विविध रुपातील सालंकृत पूजा हा अलौकिक सोहळा असतो. त्या पार्श्वभुमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या तयारीला आता वेग आला आहे. एकीकडे दर्शन रांगा, बॅरिकेडस, दर्शन मंडपाची सोय केली जात असताना दुसरीकडे अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. मंदिराचे व्यवस्थापन महादेव दिंडे यांच्या हस्ते स्वच्छतेच्या साहित्याचे पूजन झाले. यावेळी आय स्मार्ट कंपनीचे संजय माने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 05, 2023 6:32 PM