कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे. नवरात्रौत्सवाच्या तयारीअंतर्गत दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते. पहिल्यांदा सोन्याचे व जडावाचे अलंकार व त्यानंतरच्या दिवशी चांदीचे अलंकार व पूजेच्या साहित्यांची स्वच्छता होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता गरूड मंडपात या अलंकार स्वच्छतेला प्रारंभ झाला. या सगळ्या अलंकारांची सराफ कारागिरांनी स्वच्छता केली. यावेळी समितीचे सचिव विजय पोवार, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर उपस्थित होते.नवरात्रौत्सवाला आता केवळ चार दिवस राहिल्याने देवस्थान समितीच्या वतीने सुरू असलेल्या तयारीला वेग आला आहे. देवस्थान समितीच्या कार्यालयाशेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे मांडव उभारण्यात येत आहे.