कोल्हापूर : नैसर्गिक व भौगोलिक सौंदर्याने लाखो पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या लेह-लडाख परिसरातील दऱ्याखोऱ्यांत पर्यटकांनी टाकलेला कचरा उचलून कोल्हापुरातील तरुणांनी अभ्यासदौऱ्याच्या कालावधीत स्वच्छता मोहीम राबविली. इतकेच नव्हे तर दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडिया या संस्थेचे पदाधिकारी असलेल्या या तरुणांनी फौंडेशनतर्फे या परिसरातील पक्ष्यांसाठी त्या भागात घरटी लावून देण्याची मोहीमही राबविली.‘थ्री इडियट’ सिनेमानंतर लेह-लडाख परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कैकपटींनी वाढली आहे. देशभरातूनच नव्हे तर परदेशांतूनही लाखोंच्या संख्येने बायकर्स येथे येत असल्याने नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भागात बऱ्याच पर्यटकांकडून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच इतर कचरा फेकला जात आहे. त्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला आहे.
जम्मू आणि काश्मीर येथील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे व कारगीलचे जिल्हाधिकारी बशीर चौधरी यांंच्याशी फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात चर्चा करून फौंडेशनतर्फे ‘पक्ष्यांसाठी घरटे’ ही मोहीम राबविली. काश्मीर व लेह-लडाख येथे प्रचंड थंडी असूनसुद्धा चिमण्या व इतर लहान पक्षी फार मोठ्या प्रमाणावर आहेत.
या लहान पक्ष्यांसाठी बांबूपासून बनविलेल्या नैसर्गिक घरट्यांमुळे अधिवास मिळेल, असा विश्वास त्या दोघांनी व्यक्त करून दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे, पदाधिकारी विश्वजित सावंत, अॅड. धैर्यशील पवार, रोहन राशिंगकर व शार्दूल गरगटे यांनी राबविलेल्या या मोहिमेचे कौतुक केले.
भविष्यात जम्मू आणि काश्मीर प्रशासन व दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडियामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी ग्वाही दिली. लेहमधील स्थानिक सामाजिक संस्थेने या कार्याबद्दल ‘दि कॉन्झर्व्हेशन फौंडेशन आॅफ इंडिया’च्या या उपक्रमांचे कौतुक केले व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले.