कोल्हापूर : राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार खाऊ गल्ली येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा परिसर त्वरित स्वच्छ करावा. या मागणीसाठी बुधवारी या परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.राजारामपुरी परिसरातील अनेक गल्यांमध्ये गटारी तुडुंब भरल्यामुळे त्याचे पाणी रस्त्यावर येत आहे; त्यामुळे बहुतांशी गल्ल्यांना दलदलीचे स्वरूप आले आहे. मेन रोडवरील गटारी वेळोवेळी साफ न केल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. त्वरित औषध फवारणी न केल्यास डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळेल; त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरात त्वरित औषधांची फवारणी करावी.
गेले काही दिवस पावसाचे पाणी साचून राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील स्वच्छता त्वरित न केल्यास या साचलेल्या पाण्यात बसून नागरिक आंदोलन करतील, असा इशारा देत नागरिकांनी उपअभियंता आर. के. जाधव यांना निवेदन दिले.यावेळी रहिम सनदी, वल्लभ जामसांडेकर, अजिंक्य शेळके, सुमित शिंदे, मुबीन मुजावर, मंदार तपकिरे, शशिकांत सांगाळे, जयकुमार परमाज, निवृत्ती पाटील, सुनीता देसाई, शब्बीर काझी, प्रवीण पालणकर, रौनक शेटे, बबलू सोलकर, सुमित जामसांडेकर, नीलेश कोळेकर, आदी उपस्थित होते.