घन:शाम कुंभार - यड्राव -येथील कचऱ्याचा उठाव वेळच्या वेळी होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणते काम करू अन् कोणते नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छतेशिवाय इतर कामे कर्मचाऱ्यांना लावल्याने परिसर स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’ झाली आहे. यामुळे स्वच्छता अभियान नावापुरतेच राहिले आहे.यड्राव मुख्य गावाभोवती वस्ती वाढल्याने उपनगरे स्थापितझाली आहेत. रेणुकानगर, इंदिरानगर, शामनगर, आर. के. नगर, पार्वती हौसिंग सोसायटी, अशा विस्तीर्ण परिसरामुळे स्वच्छता करण्याचे काम तेरा कर्मचाऱ्यांवर आहे. प्रत्येक भागाकडे पंधरा दिवसांतून एक दिवस स्वच्छतेसाठी मिळतो. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना दुसरे काम लागले की, पुन्हा पंधरा दिवस स्वच्छता राहिल्यामुळे कचऱ्याचा साठा वाढतो. कचरा उठावासाठी विशिष्ट प्रभागात प्राधान्य दिले जात असल्याने सदस्य व पुढाऱ्यांचा कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. याचबरोबर काही खासगी उद्योगांसमोर होत असलेली स्वच्छता हाही चर्चेचा विषय होत आहे. गावातील षट्कोन शाळा मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा गळतीचेही काम करावे लागत असल्याने स्वच्छता कामात खंड पडत आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. गावच्या पश्चिम भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे कचऱ्यांचे ढीग विस्कटल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. घरातील व घराबाहेरील कचरा कुंडीत टाकण्याची जबाबदारीही ग्रामस्थांची आहे. यामुळे स्वच्छता करण्यास कर्मचाऱ्यांना सोईचे होईल व स्वच्छता अभियान राबविले याचे समाधानही त्यातून मिळेल. ग्रामपंचायतीकडून कचरा उठावाचे नियोजन होणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना इतर कामे न लावल्यास ग्राम स्वच्छता होईल. गरजेची कामे संबंधित विभागांनी केल्यास योग्य नियोजन होईल. पुरस्काराच्या जबाबदारीकडे दुर्लक्षसध्या डेंग्यूच्या आजाराचा बोलबाला सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छता अभियान’ राबवित आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते. अशा स्थितीत ग्रामपंचायत स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाही. कारण ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्रामचे पुरस्कार पंचायतीस मिळाले आहेत. पुरस्कारानंतर जबाबदारी वाढते याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.
यड्रावमध्ये स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’!
By admin | Published: November 17, 2014 11:20 PM