कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील वाहतूक विभागातील लिपिकाचा अहवाल बुधवारी (दि. १) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आो. ४० कर्मचारी संपर्कात असून त्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये सात जणांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेऊन त्यांना क्वारंटाईन केले.जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १८ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये कागल येथील २९ वयाच्या एकाचा समावेश आहे. संबंधित व्यक्ती एस. टी. महामंडळात काम करीत आहे. ती कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकालगत असणाऱ्या विभागीय कार्यालयामध्ये वाहतूक शाखेत लिपिकपदी कार्यरत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या दिवसापासून ते सुट्टीवर होते. गुरुवारी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय कार्यालयात ४० कर्मचारी आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांनी तत्काळ पथक पाठवून संपूर्ण कार्यालयात औषध फवारणी केली. तसेच कार्यालयातील सर्वांची तपासणी केली. यामध्ये संपर्कातील तसेच तापासह इतर लक्षणे असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना सीपीआर रुग्णालयामध्ये नेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासण्यासाठी घेण्यात आला. यानंतर सातही जणांना शिवाजी विद्यापीठ येथे क्वारंटाईन केले.