संजय थोरात- नूल -आई-वडिलांच्या मायेला बालपणीच तो पोरका झाला आणि आजोळी आजीच्या आश्रयाला आला. शिक्षणातला ‘गमभन’ शिकता शिकता बालवयातच त्याच्या नशिबी कष्टाची कामे आली. शिकूनशान मोठं व्हायच स्वप्न उराशी बाळगलं. मात्र, स्वप्नांचा चक्काचूर झाला अन् चक्क मृत्यूसमोर आला. न्यूमोनियाच्या निमित्तानं त्यानं जग सोडलं. या अनाथ अन् कमनशिबी बालकाच नाव आहे अभिषेक आपाण्णा गौरोजी (वय ८, रा. जरळी, ता. गडहिंग्लज).अभिषेक जरळीतील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत दुसरीमध्ये शिकत होता. मांगनूर (ता. हुक्केरी) हे त्याच गाव. आई तनुजा व वडील आपाण्णा गौरोजी यांचेही दुर्धर आजाराने निधन झाले आणि अभिषेकच्या नशिबी अनाथपण आलं. नातवाला शिकवून त्याला त्याच्या पायावर उभं करायचं, या भोळ्या आशेपोटी आजी शांताबाई मारुती पुंडे यांनी त्यास जरळीला आजोळी आणले. मात्र, आजोळातसुद्धा त्याच्या नशिबान पाठ सोडली नाही. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्यास अनाथ विद्यार्थी म्हणून गणवेश, रेनकोट, बूट, दप्तर, वह्या दिल्या होत्या. साहित्य मिळाल्यापासून अभिषेक आनंदात शाळेत यायचा. मात्र, चार दिवसांपूर्वी त्याला न्यूमोनिया झाला. गावात, उपजिल्हा रुग्णालय व सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार झाले. मात्र, अभिषेकच्या नशिबातील मृत्यूचा योग टळला नाही. काल त्याने हे जग सोडलं. अभिषेक गेल्याच समजताच जरळीकरांच्या जिवाला चटका बसला, तर शाळेतील त्याचे मित्र व शिक्षकांनासुद्धा गहिवरून आले. घरातील कामांची जबाबदारीआठ वर्षांचा असतानाही तो घरातली सर्व काम करायचा. जनावरांना चारा घालणे, पाणी पाजणे, त्यांना नदीवर नेऊन धुणे, घरात पाणी भरणे, आदी काम तो करत. वृद्ध आजीची आजारपणाची सेवा तो बजावायचा आणि त्यातूनही वेळ मिळेल तेव्हा शाळेत जायचा. शाळेत वर्गात रमायचा, गाणी, कविता गायचा. वर्गशिक्षक काशिनाथ साखरे यांनाही त्याचा लळा लागलेला. घरची परिस्थिती माहिती असल्यानं त्यांनीही अभिषेकला मदतीचा हात दिला.
अभिषेकच्या मृत्यूने जरळीकरांना चटका
By admin | Published: September 22, 2014 10:23 PM