जहाँगीर शेख ।कागल : ‘लिंगाणा’ सह्याद्री पर्वतामधील एक अजस्र सुळका. किल्ले रायगडजवळ असणाऱ्या या सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याचा प्रयत्न अनेक गिर्यारोहक करीत असतात. त्यासाठी विविध साधनांचा वापर हे धाडसी लोक करतात; पण कोणतेही साधन न घेता तब्बल दोन हजार ९६९ फूट उंची असलेला हा लिंगाणा सर करण्याची कामगिरी बजावली आहे कागल तालुक्यातील करनूर येथील सागर विजय नलवडे या युवकाने.
चार मैलांचे चढण अवघ्या सोळा मिनिटे चाळीस सेकंदांत पूर्ण केले आणि परत यशस्वीरीत्या कोणतेही साधन न वापरता खाली उतरण्याची ही देदीप्यमान कामगिरी त्याने केली आहे. त्याच्या या मोहिमेचे आयोजन ‘बा रायगड परिवार’ या दुर्ग भ्रमंती व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थेने केले होते. २१ मार्च रोजी झालेल्या या मोहिमेची दखल देशभरातील दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहण क्षेत्राने घेतली आहे.
बा रायगड परिवारातील सदस्यांनी आपत्कालीन यंत्रणाही पायथ्याशी सज्ज ठेवली होती. या संपूर्ण मोहिमेचे चित्रीकरण ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सोशल मीडियात तसेच काही न्यूज आणि अॅडव्हेंचर स्पोर्टस् चॅनेलवर या क्लीप वेगाने व्हायरल झाल्या आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या युवकाच्या कामगिरीचे एकच कौतुक होत आहे.कोण आहे सागर नलवडे : करनूर गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सागर हा मुंबईतील एका कंपनीत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचा फायर अॅण्ड सेफ्टी इंजिनिअरिंग हा डिप्लोमा झाला आहे. आई शोभाताई आणि भाऊ चंद्रकांत गावी राहतात. वडिलांचे २००७ मध्ये निधन झाले आहे. पत्नी तेजस्वीसह तो मुंबईत राहतो. ‘बा रायगड’ या संस्थेच्या माध्यमातून तो अशा साहसी मोहिमांचे आयोजन करतो.पुढचे ध्येय माउंट एल्जबुल शिखर‘लोकमत’शी बोलताना सागर म्हणाला की, कोणत्याही साधनाचा आधार न घेता अशी चढाई करणे हा गिर्यारोहणातील महत्त्वाचा आणि खूप अनुभवानंतर, सरावानंतर आत्मसात होणारा प्रकार आहे. दुर्गभ्रमंती मोहिमेतून आपणास ही प्रेरणा लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून मी ही चढाई पूर्ण केली आहे. जगातील सात अवघड असे सुळके आहेत. त्यामधील रशियातील माउंट एल्जबुल शिखर एक आहे. ते या पद्धतीने सर करण्याचा माझा पुढील निर्धार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे.काय आहे हा लिंगाणा सुळका !१६५६ ला छ. शिवरायांनी जावळी जिंकली. तेव्हा हा लिंगाणाही ताब्यात आला. ‘रायगड राजगृह, तर लिंगाणा कारागृह’ अशी म्हण पडली. इतका अवघड असा हा सुळका. एकदा कैद्याला येथे पोहोचविले की तो पळून जाण्याचे धाडस करणार नाही, अशी याची रचना आहे. मध्यावर दोन गुहा तसेच थोडी मोकळी जागा आहे, तर टोकावर वीस फूट रुंद, पंचवीस फूट लांब अशी जागा आहे. शिवलिंगासारखा आकार असल्याने याचे नाव लिंगाणा असे पडले. आजूबाजूस रायगड, राजगड, तोरणा हे किल्ले आहेत.