कोल्हापूर ,2 :पापाची तिकटी येथे काल (रविवारी) ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी घुसून दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १८ जण जखमी झाले होते. हे सर्व राजारामपुरी (मातंग वसाहत) येथील असल्याने सोमवारी राजारामपुरी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे दिवसभर कडकडीत बंद होता.
या अपघातातील मयत राजारामपुरीमधील रहिवासी असल्यामुळे येथील सर्वच दुकानदारांनी आज (सोमवार) सकाळपासूनच बंद पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली. काल (रविवारी) रात्री घडलेल्या घटनेचे पडसाद राजारामपुरी येथे सोमवारीही उमटले.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अपघातात राजारामपुरीतील दोन जणांचा मृत्यू, तर १८ जण जखमी झाल्याचे समजताच राजारामपुरी मुख्य रस्त्यासह सर्व परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन युवकांनी केली.
याचा परिणाम म्हणून सोमवारीही राजारामपुरीतील सर्व दुकाने बंद राहीली. त्यामुळे एक प्रकारे कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ही एक मोठी व्यापारीपेठ मानली जाते. पण बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. या परिसरासह शहरात दिवसभरात केएमटी बसेस धावल्या नाहीत.