कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड परिसरात पाण्याची टाकी उभारण्याचे मूळ काम ८१ लाख ७३ हजार रुपयांचे; पण निविदा मंजूर झाली १०९ टक्के जादा दराची; म्हणजेच तब्बल १ कोटी ७५ लाखांची! टाकीचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरीही या टाकीत अद्याप पाण्याचा एक थेंब पडलेला नाही. प्रशासनाने निवडलेली चुकीची जागा, ठेकेदाराने काम करण्यास लावलेला विलंब आणि चुकीच्या कामाचा फटका मात्र या टाकीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील हजारो नागरिकांना बसला आहे. पैसेच्या पैसे गेले अन् पाण्याचाही पत्ता नाही; त्यामुळे नागरिकांसाठी हे काम केले की पैसे लाटण्यासाठी, अशी शंका निर्माण झाली आहे. या कामात पन्नास लाखांचा ढपला पाडल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला.कोल्हापूर महानगरपालिकेच्या या अजब कारभारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाणीपुरवठा विभागाने मार्केट यार्ड परिसरात २० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचे काम हाती घेतले. मूळ अंदाजपत्रकानुसार या कामाची किंमत ८१ लाख ७३ हजार रुपये होती. या कामासाठी मे. जे. एन. सिंग सिव्हिल इंजिनिअर या ठेकेदाराने १०९ टक्के जादा दराने निविदा भरली होती. अन्य ठेकेदाराने हे काम मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याची तयारी दाखविली होती. तरीही ते जे. एन. सिंग यांना काम दिले गेले. ८१ लाख ७३ हजारांचे हे काम १ कोटी ७५ लाखांवर गेले. सिंग यांना आतापर्यंत ही रक्कम अदा केली. कामाची मुदत संपून गेल्यानंतर नऊ महिने उशिरा काम पूर्ण केले गेले. तरीही ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही. आता पुन्हा ठेकेदाराने जादा कामाचे ३६ लाख रुपये बिल मिळावे म्हणून महापालिकेकडे पत्रव्यवहार केला असून, काही अधिकारी ते अदा करण्याच्या प्रयत्नात आहेत. मूळ किमतीपेक्षा १०९ टक्के जादा रक्कम खर्च करूनही या टाकीत अद्याप पाण्याचा एक थेंब पडलेला नाही. एकदा चाचणी घेण्यासाठी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी पाण्याची टाकी भरण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला; कारण या टाकीत पाणीच चढत नाही. टाकीसाठी निवडलेली चुकीची जागा, झालेले चुकीचे काम यामुळे टाकी भरत नसल्याची बाब आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करून टाकी बांधूनही काहीच उपयोग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या टाकीच्या चुकीच्या कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)कामाचे पुनर्मूल्यांकन करावेपाण्याच्या टाकीचे जे काम पूर्ण केले आहे, त्याचे पुनर्मूल्यांकन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावे. टाकीत पाणी पडत नाही याची जबाबदारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याकडून झालेला खर्च वसूल करावा; तसेच जे. एन. सिंग यांना काळ्या यादीत टाकावे, अशा मागण्या शेटे यांनी केल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, मेंबर सेक्रेटरी जीवन प्राधिकरण, महापालिकेचे आयुक्त यांच्याकडेही अशा प्रकारची मागणी केली आहे.
पाण्याच्या टाकीत ढपला
By admin | Published: June 23, 2016 12:39 AM