कोल्हापूर : जिल्ह्यातील बंद साखर कारखान्यांकडे शासनाचे ३२ कोटी ४१ लाख रुपयांचे भागभांडवल अडकले आहे. हा हप्ता थकल्याने साखर आयुक्तांनी चालू कारखान्यांपैकी ‘कुंभी’, ‘सदाशिवराव मंडलिक’, ‘शरद’, ‘डी. वाय. पाटील’ यांचा गाळप परवाना रोखला होता; पण त्यांनी भागभांडवलाचा देय हप्ता भरल्याने परवान्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साखर कारखाना सुरू करताना अथवा मध्यंतरीच्या टप्प्यात शासन कारखान्यांना भागभांडवल म्हणून पैसे देते. त्याचा परतावा साधारणत: दहा वर्षांनंतर कारखाना सक्षम झाल्यानंतर करावयाचा असतो. प्रत्येक वर्षी कारखान्यांना हा हप्ता येतो, बहुतांशी कारखाने त्याची नियमित परतफेड करतात. मात्र, यंदा कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखाना, हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखाना व डी. वाय. पाटील साखर कारखाना पळसंबे (ता. गगनबावडा) या कारखान्यांचे हप्ते थकले होते. ‘कुंभी’ला तीन कोटी ८८ लाख रुपये दिले असून, ३८ लाख ८५ हजार रुपये थकीत हप्ता होता. यापैकी १० टक्केप्रमाणे तीन लाख ८८ हजार रुपये भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी भरले आहेत.
‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्याकडे तीन कोटी दहा लाख शिल्लक भागभांडवल आहे. त्यातील ७० लाख भरल्याने त्यांच्या गाळप परवान्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.इंदिरा महिला साखर कारखाना, तांबाळे (ता. भुदरगड)कडे १७ कोटी २८ लाख रुपये भागभांडवल आहे. त्यातील १६ कोटी ७८ लाख थकीत आहेत. देवर्डे (ता. भुदरगड) येथील भुदरगड तालुका साखर कारखान्याकडे १५ लाख, तर धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री साखर कारखान्याकडे १२ कोटींचे भागभांडवल थकीत आहे.‘दत्त’ आसुर्लेची विक्री, तरीही थकीतचआसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्याची दालमिया शुगर्स प्रा. लि.ला तब्बल १०८ कोटी रुपयांनी विक्री केली. वास्तविक कारखाना लिलावाची प्रक्रिया राबविताना शासकीय येणे-देणेबाबत काही अटी होत्या. त्यानुसार शासकीय भागभांडवलाबाबतही चर्चा झाली होती; पण त्यांच्याकडे अद्याप तीन कोटी ४८ लाख ७५ हजारांचे भागभांडवल अडकून आहे.विभागात दीड लाख टनांपेक्षा अधिक गाळपविभागातील सुमारे २४ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यांनी आतापर्यंत दीड लाख टनांपेक्षा अधिक गाळप केले असून, सर्वाधिक गाळप डी. वाय. पाटील साखर कारखान्याने ४४ हजार ७०० टनांचे केले आहे.