कोल्हापूर : शालेय पोषण आहार देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या केंद्रीय किचन पद्धतीचे धोरण चुकीचे असून ते रद्द करावे, असा ठराव कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या अधिवेशनात केला. तसेच पोषण आहार फरकाची व इंधनाची बिले तत्काळ द्यावीत, अशी मागणी केली. पोषण आहार कामगार संघटनेचे अधिवेशन महापालिका कर्मचारी हॉलमध्ये मंगळवारी झाले. ‘सिटू’शी संलग्न असणाऱ्या या संघटनेची स्थापना २०१४ मध्ये झाली. पहिले अधिवेशन १५ आॅगस्ट २०१४ रोजी जयसिंगपूर येथे झाले. पूनम बुकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुजाता पाटील, विद्या नाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल नाईक यांनी दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत पोषण आहार कामगारांसमोरील अडचणींचा पाढाच वाचला. पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन किमान वेतन द्यावे व सामाजिक सुरक्षा लागू करावी, असा ठराव अमोल नाईक यांनी केला. केंद्रीय किचन पद्धतीचे धोरण रद्द करा, फरकाची बिले तत्काळ द्या, आदी महत्त्वपूर्ण ठराव भगवान पाटील यांनी मांडले. इचलकरंजी, गडहिंग्लज येथे ९ आॅगस्ट रोजी सत्याग्रहाचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन यावेळी ए. बी. पाटील यांनी केले आहे. अश्विनी साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पोषण आहार कामगार संघटनेचे ए. बी. पाटील अध्यक्षयावेळी १२ तालुक्यांतून पोषण आहार कामगार संघटनेची २९ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी प्राचार्य ए. बी. पाटील, सरचिटणीसपदी अमोल नाईक, प्रा. आर. एन. पाटील व भगवान पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यासह चार उपाध्यक्ष, सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली.
केंद्रीय किचन पद्धती बंद करा
By admin | Published: July 20, 2016 12:45 AM