गगनबावडा : असळज (ता. गगनबावडा) येथील महिलांनी दारूबंदी विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होत असून, दारू दुकाने बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलाविण्याची मागणीदेखील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.दारू दुकाने मुख्य बाजारपेठ, एस. टी. थांबा, तसेच शाळा आणि वस्तीच्या ठिकाणी असल्याने त्याचा असंख्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. दारूमुळे गावागावांमध्ये आणि घरात देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडणतंटे होत आहेत. दिवसेंदिवस व्यसनाधीनता वाढत असून, तरुण वर्गदेखील दारूचा व्यसनाधीन बनत आहे. या सर्वांचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.आजपर्यंत अनेक व्यक्ती दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. घरातील कर्ता पुरुष दारूच्या व्यसनामुळे वाया गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यामुळे असळज गाव व्यसनमुक्त व्हावे, यासाठी याठिकाणची दारू दुकाने बंद करण्याची गरज असून, महिलांनी याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी सर्व महिला एकत्र येऊन, सरपंच आणि ग्रामसेवकांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)केवळ दारूची दुकाने बंद करून चालणार नाहीत, तर दारूबंदीची चळवळ घरापासून सुरू केली पाहिजे. महिलांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, सरपंच या नात्याने दारूबंदीच्या लढ्यास सर्वतोपरी सहकार्य करू.- प्रकाश पोवार, सरपंच-असळज.दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तरुणवर्ग देखील दारूच्या व्यसनाला बळी पडत आहे. दारू व्यावसायिक कितीही बलाढ्य असले तरी, आम्ही आमिषाला बळी न पडता दारू मुक्तीचा लढा तडीस नेऊ.- गायत्री लटके, ग्रामस्थ
असळजमधील दारू दुकान बंद करा
By admin | Published: March 04, 2016 12:31 AM