कोल्हापूर : कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे. या शहराचे पावित्र्य जपण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेला मटका-जुगार पूर्णत: बंद झाला पाहिजे. परिसरात मटका व्यावसायिकांचे वास्तव्य आहे, त्यांना तडीपार करा, अवैध धंदे समूळ उखडून काढा. येथील सर्व वाईट गोष्टींंना फोडून काढा. येत्या पंधरा दिवसांत बदल दिसला पाहिजे, अशा कडक सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना दिल्या. मंगळवारी पोलिस ठाण्यात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार संवादा’मध्ये नांगरे-पाटील यांनी थेट देशमुख यांच्या कारभारावरच अंकुश ठेवल्याने उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावल्या. वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्णातील पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीस मंगळवारपासून प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी कागल पोलिस ठाण्याची तपासणी केली. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी शहरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या तपासणीला सुरुवात केली. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भेडसावणाऱ्या समस्या, तसेच नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. नांगरे-पाटील यांनी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. शहरातील वाहतूक समस्या, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, सार्वजनिक बागेत सुरू असलेले ओपन बार, महिलांची सुरक्षा, अल्पवयीन मुले-मुली वाहने चालवितात, त्यामुळे होणारे अपघात, परप्रांतीयांचा शिरकाव, आदी प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे, लाला गायकवाड, महेश जाधव, माजी नगरसेवक आदिल फरास, गणी आजरेकर, कादर मलबारी, अजित राऊत, शेखर गोसावी, रणजित आयरेकर, दीपा मगदूम, आदींनी मते व्यक्त करीत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. त्यावर नांगरे-पाटील यांनी, पोलिस दल लोकांना विश्वासात घेऊन चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांचे बंधूच राजारामपुरी पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळतात. त्यांच्यासारख्या कामाची अपेक्षा मी देशमुख यांच्याकडून करतो. हद्दीत व्हिडीओ गेमच्या माध्यमातून मटका-जुगार सुरू आहे, तो पूर्णत: बंद झाला पाहिजे. पडद्याआड वास्तव्यास असणाऱ्या मटका व्यावसायिकांना तडीपार करावे, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे. बेशिस्तपणा आणि गुंडगिरी मोडून काढावी. परिसरात सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यापारी मंडळ, महापालिका यांच्या माध्यमातून उपाययोजना करावी. फुटबॉल व कुस्तीचे सामने भरविण्यासाठी आपले सहकार्य राहील; परंतु कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करील त्याची गय केली जाणार नाही. शहरातील सार्वजनिक उद्याने, मैदानांमध्ये मध्ये सुरू असणारे ओपन बार बंद केले जातील. यावेळी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, आदींसह नागरिक उपस्थित होते. देशमुखांचे षड्यंत्र‘पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी आहे. पण मला काहीतरी षड्यंत्र दिसत आहे. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी या ठिकाणी भाषण करणारे लोक आणलेले आहेत. ‘आयजींं’ना व्यस्त ठेवलं की काम बाजूला राहील. मी त्याच्यासाठी काही तयार नाही. वरिष्ठांची कोणतीही अपेक्षा नाही. पोलिस प्रशासनात पारदर्शकपणे काम केले जाते. मला माझं काम करायचं आहे. रात्री दहा वाजले तरी मी येथून हलणार नाही,’ असे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. पासपोर्ट मेळावा पासपोर्ट काढण्यासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. शहरात जुना राजवाडा, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांच्या स्तरावर पासपोर्ट कॅम्प राबविला जाईल. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळली जाईल.बोंद्रेनगरला पोलिस चौकीबोंद्रेनगर-धनगरवाडा परिसरात गुंडांच्या त्रासाला कंटाळून दोन युवतींनी आत्महत्या केल्या, ही गोष्ट फारच गंभीर आहे. येथील युवती-महिलांच्या सुरक्षेसाठी तेथे स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन केली जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
राजवाडा हद्दीतील मटका बंद करा
By admin | Published: March 15, 2017 12:02 AM