कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार दिवसांपासून बंद असून आज शनिवारी सकाळीही परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक आजही ठप्प आहे. शनिवार, दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला.
कोल्हापुरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली उड्डाण पुलावर सकाळी १०.३० वाजताही पुराच्या पाण्याची पातळी अजूनही साडेचार फुट आहे. हे पाणी संथ गतीने उतरत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक आजही ठप्पच आहे. जवळपास २५ हजार वाहने या मार्गावर अडकून आहेत. दरम्यान, काल दिवसभरात फक्त ६ ते ८ इंच पाणी पातळी कमी झाली आहे,अशी माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली आहे.