जयसिंगपूर : बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण बंद करून पूर्वीप्रमाणे नोंदणी सुरू करावी. ऑनलाईनच्या नावाखाली बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी वंचित ठेवण्याचा घाट या मंडळाचे सचिव श्रीरंगम करीत आहेत, त्यांची हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील बांधकाम कामगारांच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले.
बांधकाम कामगार हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदीत आहेत. येथे नवीन नोंदणी व नूतनीकरण सतत चालू असते. गेली एक वर्षे नवीन नोंदणी या कार्यालयाकडून झालेली नाही. ऑनलाईनच्या नावाखाली बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणपासून वंचित ठेवण्याचे काम मंडळाचे सचिव श्रीरंगम करीत आहेत. महाआघाडीचे सरकार आल्यापासून नवीन नोंदणी नूतनीकरणासह सर्वच कामे बंद आहेत. ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर अधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी येऊन ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव श्रीरंगम यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर मदन मुरगुंडे, आनंदा गुरव, संजय खानविलकर, किरण माने, गणेश तडाखे, आकाश बनसोडे, बापू कांबळे, रणजित माने, नसीर बारगीर, नीलेश दिशांत, विजय कांबळे, रघुनाथ देशिंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - ०७१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे बांधकाम कामगारांच्यावतीने आरोग्यराज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.