सांगली : कामानिमित्त अथवा नातेवाईकांकडे घर बंद करून जाताय... सावधान... तुमच्या घरावर चोरट्यांची नजर असणार आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरात पुन्हा एकदा घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंवर चोरटे हात साफ करत आहेत. गेल्या महिन्याभरात शहरात सात मोठ्या घरफोड्या झाल्या असून, बसस्थानकात दागिने लांबविणे, धूमस्टाईलने दागिने चोरीच्या घटनांतही वाढ झाली आहे.
शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना, गेल्या महिन्याभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दिवाळीपासून शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ती अद्यापही कायम आहे. चोरट्यांनी अगदी गजबजलेल्या परिसरातील घरे आणि फ्लॅटही फोडून ऐवज लंपास केला आहे. गेल्या महिन्यात तर पोलीस कॉलनीतच चोरीचा प्रकार घडला होता.
कामाच्या निमित्ताने अथवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी अनेकजण एखादा दिवस घरे बंद करून जातात. एकाच दिवसात परत येण्याचे नियोजन असल्याने अनेकदा घरात कोणाला न थांबविता कुलूप लावले जाते. नेमकी हीच घरे चोरटे लक्ष्य करत आहेत. यासह बसस्थानक परिसरात प्रवाशांचे दागिने लंपास करण्याचेही प्रकार वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
पोलीस प्रशासनाने नुकतीच गृहनिर्माण सोसायटींच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी चो-यांचे प्रकार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही चोरीचे प्रकार सुरूच असल्याने नागरिकांत अस्वस्थता कायम आहे. शहरातील वाढत्या चो-यांचा आलेख पाहता, पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असली तरी, पोलिसांना चकवा देऊन चोºया होतच आहेत. अशा चोरीच्या घटनांवर आता आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.