कोल्हापूर : कृषी विधेयकाविरोधात उद्या शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या देशव्यापी संपात कोल्हापूरकरही सामील होणार आहेत. जिल्ह्यातील समन्वय समितीने ताकदीने उतरण्याचे आवाहन केले आहे.
यानिमित्ताने उद्या सकाळी बिंदू चौकात निदर्शने, बंदमध्ये सामील होण्यासाठी आवाहन करणारी मोटारसायकल रॅली, गावोगावी सभा घेऊन व्यवहार बंद ठेवणे आदीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वय समितीचे प्रा. उदय नारकर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, पण सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही. याविरोधात शेतकऱ्यांनी यापूर्वी देशव्यापी संप पुकारला होता, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा बंदचे आवाहन केले आहे. उद्या होणाऱ्या या बंदमध्ये राज्यातील सर्व शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. याशिवाय समन्वय समितीशी संलग्न असणाऱ्या किसान सभा, माकप, भाकप, जनता दल, कामगार संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काॅंग्रेस या बंदमध्ये ताकदीने उतरेल असे जाहीर केले आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या चार महिन्यात डाव्या संघटना व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते अलिप्तच राहिल्याचे दिसते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर तरी निदान उद्याच्या आंदोलनात हे कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते सहभागी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.