कोल्हापूर : रात्री आठनंतर खरेदीदार नीलेश पटेल यांनी गुळाची गाडी का भरली, या कारणावरून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी गुळाचा सौदा बंद पाडला. खरेदीदार व हमालांच्या वादात तब्बल दोन तास सौदा ठप्प झाला, चर्चेनंतर साडेबारा वाजता सौदा पूर्ववत सुरू करण्यात आला. गूळ मार्केटमधील हमालांची काम करण्याची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ आहे. रात्री आठनंतर ते कामाला हात लावत नाहीत. वास्तविक त्यांची वेळेवर नाहीतर नगावर मजुरी मिळत असल्याने आठनंतरही थोडे काम करावे, अशी खरेदीदारांची भूमिका आहे; पण हमालांचा त्याला विरोध आहे. शनिवारी रात्री गूळ खरेदीदार नीलेश पटेल यांच्या दुकानात गाडी भरण्याचे काम सुरू असताना ५० गुळाचे रवे शिल्लक होते. तोपर्यंत रात्री आठ वाजल्याने हमालांनी काम बंद केले. ५० रव्यांसाठी दोन टनांची गाडी रात्रभर थांबणार असल्याने पटेल यांनी खासगी यंत्रणेकडून उर्वरित रवे भरून घेतले. यामुळे हमाल संतप्त झाले. सोमवारी सकाळी सौदा सुरू झाला; पण साईलीला अडत दुकानात सौदा आल्यानंतर त्यापुढील पटेल यांच्या दुकानात सौदा काढायचा नाही, अशी भूमिका हमालांनी घेतली. सहायक सचिव मोहन सालपे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण पटेल यांनी दोन हजार रुपये दंड भरावा मगच सौदे सुरू करावेत, असे हमालांनी सांगितल्याने संतप्त खरेदीदारांनी सौदा सोडला. त्यानंतर संबंधित घटकांशी चर्चा करून सौदे पूर्ववत केले. कांद्यानंतर आता गुळाची पाळीदोन दिवसांपूर्वी हमाल व खरेदीदार यांच्यातील मतभेदामुळे कांद्याचे सौदे बंद पडले होते. दोन दिवस कांद्याचे सौदे अडखळतच सुरू राहिले. त्यानंतर सोमवारी गुळातील हमालांनी सौदे बंद पाडल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. हमालांच्या ताठर भूमिकेबद्दल शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पहिला सौदा, मगच चर्चाअचानक सौदा बंद पाडायचा आणि नाकेबंदी करायची ही हमालांची जुनी पद्धत आहे. सौदा बंद करून चर्चेला आलेल्या हमाल प्रतिनिधींना समिती संचालक व शेतकरी प्रतिनिधींनी चांगलेच धारेवर धरले. प्रत्येक वेळी सौदे बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असा इशारा सभापती परशराम खुडे, संचालक नंदकुमार वळंजू, साहाय्यक सचिव मोहन सालपे यांनी दिला. पहिला सौदा सुरू करा मगच चर्चेसाठी या, अशी तराटणी दिल्यानंतर सौदे सुरू झाले. गूळ घेतो त्या दिवशीच निर्गत झाला, तर दुसऱ्या दिवशी खरेदी करता येते. हमालांची तक्रार नको म्हणून यावर्षी न मागता ३० टक्केवाढ दिली. प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढ देण्याचा निर्णयही घेतला; पण ते सहकार्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गुळाचे दर पडतात. त्यांनी कामाची वेळ तासभर वाढवावी. - नीलेश पटेल (खरेदीदार) हमालीची वेळ ठरलेली आहे. त्यात कोणत्याही परिस्थित बदल होणार नाही. इतर यंत्रणेकडून हमाली करून घेणाऱ्या २५ खरेदीदारांवर आतापर्यंत कारवाई केली, मग पटेल यांनाच का सोडले जाते. - गुंडा कराले (प्रतिनिधी, हमाल युनियन)गेले दोन महिने गुळाला दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन दिवस जरा दर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील, असे वाटत असतानाच सौदा बंद पाडला. याचा परिणाम दरावर होतो. सौदा बंद न करता सर्वच घटकांनी चर्चेसाठी पुढे आले पाहिजे. - भगवान काटे (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)
बाजार समितीत गुळाचे सौदे बंद
By admin | Published: December 15, 2015 1:07 AM