लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर : मलकापुरातील उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केल्याबरोबरच वाहतूक कोंडी होत आहे. उपमार्गासह महामार्गावर तीन किलोमीटर रांगा लागल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फटका बसला. हा पूल पाडण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. मात्र, त्या अगोदरच वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शॉर्टकट जाण्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर नाका येथील उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा हा नेहमीचाच विषय बनला होता. महामार्ग सहापदरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने मलकापुरातील उड्डाणपूल पाडण्यासाठी अनेकवेळा वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतुकीतील बदलानुसार शनिवारी शिवछावा चौकातील उड्डाणपूल वाहतुकीस बंद केला. सर्व वाहतूक दोन्ही उपमार्गांवरून वळवण्यात आली होती.
बघता-बघता काही वेळातच वाहतुकीची कोंडी होऊन उपमार्गांसह महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तीन तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच वैतागले होते. या ट्रॅफिक जामचा स्थानिक नागरिकांना चागलाच फटका बसत आहे. याशिवाय रोज विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी वाहने या वाहतूक कोंडीत अडकल्याने शालेय विद्यार्थ्यांनाही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, यावेळी मुंबई-पुण्याला जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"