आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९: आॅनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी उद्या, मंगळवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार विक्रेते सहभागी होणार आहेत. या बंदसह सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी सोमवारी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान आॅनलाईन औषध विक्रीबाबत अनेकवेळा गंभीर बाबींची साशंकता व्यक्त केल्या नंतरही प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सरकार देशात ई-फार्मसी व ई-पोर्टल लागू करण्याची योजना आखत असल्यामुळे देशातील व राज्यातील औषध विक्रेत्यांनी अखिल भारतीय औषधी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
आॅनलाईन फार्मसीची निती आणि केंद्र सरकारच्या पब्लिक नोटीस विरोधात पुकारलेल्या मंगळवारच्या बंदमध्ये देशातील आठ लाख आणि महाराष्ट्रातील ५५ हजार औषध विक्रेते सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार विक्रेते या आंदोलनात सहभागी असतील. असोसिएशनद्वारे सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असोसिएशनचे कार्यालय, उद्योगभवन, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. आॅनलाईन फार्मसी विरोधातील निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी साांगितले.
अत्यावश्यक सुविधा पुरविणार बंद असला, तरी एखाद्या रुग्णाला औषधांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येईल. यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी असोसिएशनच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना आवश्यक असणारी औषधे त्वरीत उपलब्ध करुन दिली जातील,असे असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
विक्रेत्यांचा विरोध यासाठी
औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेस वाचविणे, कमी दर्जाच्या अप्रमाणित, डुप्लिकेट औषधांच्या शिरकावाची दाट शक्यता, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अॅँटिबायोटेक्स, वेदनाशामक किंवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळणे, युवकांमध्ये नशेच्या औषधांचा वापरास मोठा धोका, देशातील आठ लाख औषध विक्रेते व ४० लाख कर्मचाऱ्यांच्या कुटंबीयांवर आर्थिक संकट येणार आहे, अशा विविध कारणांमुळे औषध विक्रेत्यांचा आॅनलाईन फार्मसीला विरोध आहे. राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू असून, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.