कोल्हापूर: मृग नक्षत्रालाच मान्सूनचे आगमन होणार असल्याच्या वार्तेने शेतकरी सुखावला असला तरी कोरोना निर्बंधामुळे खरिपाचा पेरा साधण्यावरुन चिंतेचे ढग दाटले आहेत. त्यातच यावर्षी वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम म्हणून मशागतीपासून ते औषधे, खते, बियाणे यांच्या किमतीत किमान २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाईने घरानंतर शेतीचेही बजेट बिघडल्याने करायचे तरी काय आणि कसे असा सूर जागोजागी कानी पडत आहे. निदान शेती सेवा केंद्राची वेळ तरी वाढवून देण्याची मेहरबानी प्रशासनाने करावी अशी साधारण अपेक्षा आहे.
केरळमध्ये १ जूनला आणि महाराष्ट्रात ८ जूनला मान्सून दाखल होईल आणि जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसेल असा सुधारित हवामान अंदाज गुरुवारी हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून मृग नक्षत्रालाच दाखल होण्यास आता जेमतेम सव्वा महिन्याचा कालावधी उरल्याने शेतकऱ्यांची चलबिचल सुरु झाली आहे. पण सध्या वाढलेल्या कोरोनामुळे कडक लॉकडाऊन सुरु असून सकाळी ७ ते ११ यावेळेतच शेतीविषयक खरेदी-विक्रीच्या कामांना परवानगी आहे.
सकाळी जनावरांचे दूध, वैरण, पाणी करेपर्यंतच आठ वाजून जातात. मग उरलेल्या वेळात कृषी सेवा केंद्रातून हवे ते औषध, लागवड घेऊन येताना प्रचंड धावाधाव होत आहे. शिवाय आता मशागतीची कामे सुरु आहेत, त्यालाही स्वतंत्र वेळ काढावा लागतो. त्याच्या मशिनरीची दुरुस्ती, नवीन खरेदी याला देखील वेळेच्या मर्यादेमुळे अडचणी येत आहेत. या महिन्यात मशागतीची कामे पूर्ण होऊन बियाणांची खरेदीही सुरु होते, आता वळवाच्या पावसामुळे मशागतीची कामे सुलभ झाली असलीतरी बियाणे खरेदीत अडचणी येत आहेत.
चौकट ०१
जिल्ह्याला ३८ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध
जिल्ह्यात यावर्षी २ लाख २६ हजार हेक्टरवर खरीप पेरणी क्षेत्र गृहीत धरुन ३८ हजार ९८६ क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने नाेंदवली आहे. यापैकी ८ हजार ३४१ क्विंटल बियाणे महाबीजकडून तर १७ हजार ५७६ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडे उपलब्ध झाले आहे.
चौकट ०२
सोयाबीनसाठी धावाधाव
यावर्षी सोयाबीनच्या बियाणांची देशभरच टंचाई आहे. मध्यप्रदेशातून जास्त बियाणे येत होते, पण त्यांनी परराज्यातील विक्रीवर बंदी घातल्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे बियाणे आता घरोघरी शोधावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावे म्हणून १३ हजार ६९ क्विंटलची जोडणी कृषी विभागाने करुन ठेवली आहे. शेतकऱ्यांना बी उगवण क्षमता तपासण्यासाठीचे धडेही दिले जात आहेत.
चौकट ०३
पीक क्षेत्र
पीक सरासरी क्षेत्र(हेक्टरमध्ये)
भात ९३,७००
ज्वारी २३००
नागली १८८००
सोयाबीन ४१,५००
भुईमूग ३९,२००
मका २०००