कोल्हापूर : आख्खा दिवस घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघाल्यानंतर गुरुवारची मध्यरात्र ढगफुटीसदृश पावसामुळे जागून काढण्याची वेळ जिल्ह्यावर आली. गडगडाटासह आलेल्या या तुफानी पावसामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पन्हाळा व करवीर तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या तुलनेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांनी मात्र कडकडीत ऊन अनुभवले.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनने परतीची वाट धरल्यासारखी वाटचाल सुरू केली आहे. कडकडीत ऊन आणि त्यानंतर कुठे ढग थांबेल तेथे जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (दि. २) दिवसभर असेच वातावरण तापलेले होते. कडक उन्हामुळे अंग भाजून निघत होते. दुपारनंतर मात्र ढग उतरायला सुरुवात झाली.
सोसाट्याच्या वाऱ्यासह जागोजागी पाऊस झाला. रात्री आठनंतर तर जिल्ह्यातील राधानगरी व भुदरगड हे दोन तालुके वगळता ढग फुटल्यासारख्या झालेल्या पावसाने अनेकांच्या पोटात गोळा आणला. पावसाचा जोर एवढा होता की काही मिनिटांतच पाण्याचे लोट वाहू लागले.पन्हाळ्यात सर्वाधिक ३७, करवीरमध्ये ३३ मि.मी. पाऊस काही तासांतच नोंदवला गेला. गडहिंग्लजमध्ये २१, शिरोळमध्ये १९, गगनबावड्यात १८, हातकणंगले, आजरा व चंदगडमध्ये प्रत्येकी १५, शाहूवाडीमध्ये १४, कागलमध्ये ४, राधानगरी व भुदरगडमध्ये एक मि.मी. असा पाऊस झाला. गुरुवारी सकाळीही पावसाचे वातावरण होते; पण थोड्या वेळाने ते निवळले आणि पुन्हा ऊन पडले. दुपारनंतर मात्र ढग भरून आले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली.राजाराम बंधारा खुलापंचगंगा नदीवरील सात बंधारे बुधवारपर्यंत पाण्याखाली होते; पण गुरुवारी सकाळी केवळ रुई आणि इचलकरंजी हे दोन बंधारे वगळता सर्व बंधारे खुले झाले. राजाराम, सुर्वे, शिंगणापूर हे बंधारे पूर्णपणे खुले झाल्याने या मार्गावरून वाहतूकही सुरू झाली.चिकोत्रा १०० टक्के भरलेआजरा, कागल तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेले चिकोत्रा धरण गुरुवारी सकाळी १०० टक्के भरले. धरणाची घळभरणी झाल्यापासून गेल्या वर्षीपासून दुसऱ्यांदा हे १०० टक्के भरले असल्याने या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. घटप्रभा ९३ टक्के वगळता जिल्ह्यातील सर्व धरणे आजअखेरपर्यंत १०० टक्के भरली आहेत.सांगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७६ सर्कलमध्ये सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस एकट्या करवीर तालुक्यातील सांगरूळमध्ये पडला आहे. करवीरमधीलच कसबा बावडा सर्कलमध्ये ६२ मि.मी. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव सर्कलमध्ये ६१ मि.मी., हातकणंगले तालुक्यातील हेर्ले सर्कलमध्ये ६० मि.मि., शिरोळमध्ये ४०, पन्हाळ्यातीलच कोतोली ४९, कळे ४१, करवीरमधील बीडमध्ये ४५, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी सर्कलमध्ये ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.