कोल्हापूर : राज्य सरकारने हद्दवाढीची अधिसूचना काढल्याने करवीर व हातकणंगले तालुक्यांतील प्रस्तावित अठरा गावांतील ग्रामस्थ बुधवारी आक्रमक झाले. या सर्व गावांत पुन्हा असंतोष पसरला आहे. कोल्हापूर शहराच्या चारही कोपऱ्यांतील मार्ग रोखत जनतेने बुधवारी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच या अठरा गावांत ‘कामकाज बंद’ ठेवत रस्त्यावर उतरून ग्रामस्थांनी घोषणा देत सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. शिरोलीत कोल्हापूर-सांगली राज्यमार्ग अर्धा तास अडविण्यात आला. हद्दवाढविरोधी कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार करवीर पूर्व भागात बंद होता. गांधीनगर, सरनोबतवाडी, उचगाव, उजळाईवाडी, तामगाव, गडमुडशिंगी, वळिवडे येथील ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. कळंबा -गारगोटी रस्त्यावरही ग्रामस्थांनी ठिय्या मांडत तासभर रास्ता रोको केला. तसेच निषेधाच्या घोषणा देत मोटारसायकल रॅली व मोर्चा काढण्यात आला. वडणगे, गोकुळ शिरगाव, येथेही ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली. शिये ग्रामस्थांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.शिरोलीत महामार्ग रोखलाशिरोली : हद्दवाढीच्या विरोधात शिरोलीकरांनी कोल्हापूर-सांगली राज्यमार्ग सकाळी अकरा वाजता सुमारे तीस मिनिटे अडवून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. बेमुदत बंदीमध्ये शिरोलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन व्यवहार बंद ठेवले आणि आंदोलनात सर्वजण सहभागी झाले. सकाळी नऊ वाजता गावातील सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत चौकात जमले. गावातून निषेध फेरी काढून पुणे-बंगलोर महामार्ग रोखण्यासाठी सर्वजण सांगली फाटा येथे आले असता, पोलिसांनी महामार्ग रोखण्यासाठी मनाई केली. त्यामुळे आंदोलकांनी कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर आंदोलन करून राज्यमार्ग तीस मिनिटे अडविला. आंदोलनात ज्योतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार पाटील, सलिम महात, पंचायत समिती माजी सदस्य अनिल खवरे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, मेडिकल असोसिएशनचे संचालक प्रल्हाद खवरे, डॉ. सुभाष पाटील, रणजित केळुसकर, बाजार समितीचे सदस्य सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव, गोविंद घाटगे, सुनील पाटील, दीपक यादव, विनोद अंची, लियाकत गोलंदाज, मुकुंद नाळे, जगन्नाथ पाटील उपस्थित होते. कळंब्यात कडकडीत बंदकळंबा : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात संपूर्ण कळंबा ग्रामस्थ, व्यापारी यांनी बुधवारी रास्ता रोकोसह सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. हद्दवाढविरोधात समस्त ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य कळंबा गामपंचायतीसमोर सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने जमले. ग्रामस्थांपुढे बोलताना भाजपा संघटक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक बाबा देसाई यांनी शासनाच्या प्रस्तावित हद्दवाढीस ग्रामस्थांचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. हद्दवाढीविरोधात आक्रमक ग्रामस्थांनी कळंबा -गारगोटी रस्त्यावर ठिय्या मांडत एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मोटारसायकल रॅली व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश टोपकर, युवराज पाटील, विश्वास खानविलकर, अजय सावेकर, दत्ता हळदे, विश्वास गुरव, बाजीराव पोवार, प्रकाश कदम, पूजा पाटील, सुवर्णा संकपाळ, शंकुतला गुरव, आंबुबाई तिवले, कविता टिपुगडे, प्रकाश पाटील, उदय जाधव, उपस्थित होते. करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व कर्मचाऱ्यांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता.उचगावात घोषणाबाजीउचगाव : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला उचगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, तामगाव या गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज, गुरुवारी तातडीने या गावांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटून दाद मागणार आहेत. हद्दवाढविरोधात उचगाव येथील ग्रामस्थांनी मोटारसायकल रॅली व हद्दवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदविला. सकाळी दहाच्या सुमारास श्री मंगेश्वर देवालयापासून कमानीपर्यंत मुख्य रस्त्यावर एकत्र येत ग्रामस्थांनी गावातून निषेध फेरी काढली. त्याचबरोबर हद्दवाढीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी जि. प. सदस्य मंगला वळकुंजे, सरपंच सुरेखा सचिन चौगुले, माजी सरपंच अनिल शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिनकर पोवार, माजी उपसरपंच नागेश चौगुले, शिवाजीराव माळी, महालिंग जंगम, भूषण कदम, कावजी कदम, सचिन चौगुले, अॅड. सचिन देशमुख, माजी सरपंच मधुकर चव्हाण उपस्थित होते. गोकुळ शिरगावात फेरीकणेरी : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात गोकुळ शिरगाव येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गोकुळ शिरगाव बंद ठेवत गावातून निषेध फेरी काढली. सकाळी दहाच्या सुमारास गावातून निषेध फेरी काढण्यात आली. त्याबरोबर हद्दवाढीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी हद्दवाढ विरोध कृती समितीचे नाथाजी पोवार, माजी सरपंच एम. एस. पाटील, बाबूराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी टी. के. पाटील, नामदेव म्हाकवे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित करवते, संदीप पाटील, विवेक पाटील, बबनराव शिंदे, सर्जेराव मिठारी, विष्णू पाटील उपस्थित होते. उजळाईवाडीतही बंदउजळाईवाडीतही बंद ठेवून तसेच निषेध फेरी काढून हद्दवाढीला विरोध करण्यात आला. यावेळी उत्तम आबवडे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ माने, बाळू पुजारी, सचिन पाटील, काका पाटील, विजय सुतार, संजय श्रीपती माने, नारायण दळवी, रवींद्र गडकरी, प्रकाश ठाणेकर, संतोष माने उपस्थित होते. गांधीनगर परिसरात बंदगांधीनगर : हद्दवाढविरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार करवीर पूर्व भागात बंद पाळला. गांधीनगरसह गडमुडशिंगी, वळिवडे येथे ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. होलसेल व्यापारी असोसिएशन, रिटेल व्यापारी असोसिएशन, सिंधी सेंट्रल पंचायत व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बंदचा निर्णय घेऊन मंगळवारीच बंदचे नियोजन केले होते. सरपंच लक्ष्मीबाई उदासी, भजनलाल डेंबडा, दिलीप कुकरेजा, सेवादास तलरेजा, रितू लालवाणी, पूनम परमानंदानी, प्रीतम चंदवाणी, प्रताप चंदवाणी, जया चंदवाणी, सागर उदासी, ताराचंद वाघवानी, रोहन बुचडे, रियाज सनदी, पप्पू पाटील, आनंदा घोळे, सुनील जेसवाणी, आदींनी बंदचे आवाहन केले. वळिवडे येथे सरपंच रेखाताई पळसे व उपसरपंच सचिन चौगुले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी बंदमध्ये भाग घेऊन व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व संस्था, दुकाने बंद राहिली होती....तर कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद पाडूकोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणारे जलशुद्धिकरण केंद्र, उपसा केंद्र बंद पाडू, असाही इशारा प्रस्तावित शहर हद्दवाढीस विरोध करण्यासाठी बालिंगे, नागदेववाडी, शिंगणापूर या गावांच्या वतीने कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला.
अठरा गावांमध्ये कडकडीत बंद
By admin | Published: July 28, 2016 1:12 AM