कोल्हापूर - नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकावू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिला. नाणार प्रकल्पावरून सुरू असलेले राजकारण योग्य नाही, असे पवार म्हणालेत. राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणारा हा प्रकल्प आहे. कोकणात नाही जमीन मिळाली, तर प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. गुजरातला किंवा अन्य राज्यात हा प्रकल्प गेला तरी तो देशातच आहे. गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही. कोकणातील जनतेचे किंवा त्या प्रदेशाचे हा प्रकल्प झाल्यावर अहित होणार असेल तर त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी 10 मे रोजी मी प्रकल्पस्थळास भेट देणार आहे. पण तिथे सभा वगैरे घेणार नाही, असे पवार यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला असाच विरोध होत राहिला तर नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातला जाईल असा सूचक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. कोकणातील राजकीय नेते नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तेल काढण्याचा मोठा प्रकल्प नाणार इथे आणण्याचा सरकारचा मनसुबा आहे, असे म्हणाले होते. मात्र सत्तेतील शिवसेना, तसंच नारायण राणे नाणार प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिला होता.
''पर्यायी जागेचा विचार करावा''
यापूर्वीही, शरद पवार यांनी नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. नाणार प्रकल्प हा केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो महाराष्ट्रातून बाहेर जाता कामा नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेतली. पवार म्हणाले की, महाराष्ट्राबाहेर प्रकल्प जाऊ नये, म्हणून सरकारने पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो का, हे पाहणे गरजेचे आहे. स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलता येते का? याचा विचार करायला हवा. प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतरच मत व्यक्त करेन, असे म्हणत पवार यांनी त्यांची भूमिका राखून ठेवली आहे.
असा असेल हा प्रकल्पमुख्य तेल शुद्धीकरण कारखाना बाभुळवाडीत १४ हजार एकरावर.तेथून १५ किमी अंतरावर एक हजार एकर जागेवर तेलाच्या टाक्या व बंदर सुविधा.एकूण अपेक्षित खर्च तीन अब्ज रुपये.वाषिक क्षमता- ६० दशलक्ष टन तेल शुद्धिकरण व १८ दशलक्ष टन पेट्रो उत्पादने.अपेक्षित उभारणी सन २०२५ पर्यंत.