कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू व्हावा यासाठी खासदार धैर्यशील माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, नगरसेवक रवी माने यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी बुधवारी भेट घेतली. राज्यातील व्यापाराचे अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे. मात्र, त्याचवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वयंशिस्त पालन आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
तीन महिने व्यापार बंद राहिल्याने व्यापाऱ्यांच्या समोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे व्यापार तातडीने सुरू होणे आवश्यक असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर अशा सर्व ठिकाणी व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत आला असून त्याला दिलासा देण्याची गरज असल्याचे ‘महाराष्ट्र चेंबर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. व्यापार लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा असल्याचे नगरसेवक रवी माने यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष सिंग, मिलिंद नार्वेकर, डॉक्टर पांडे, आदी उपस्थित होते.