कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीत सोमवारी (दि.२३) विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी ४३ पंचनाम्यांची यादी सादर केली. जिल्हा न्यायाधीश-३ एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी सात फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, संशयित आरोपी समीर गायकवाड याला पायाच्या शस्त्रक्रियेसाठी दोन महिने एसआयटीकडील दर रविवारच्या हजेरीत सवलत मिळावी, असा अर्ज संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी केला.पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात दहा संशयितांवर दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील राणे यांनी पंचनाम्यांची यादी सादर केली. या यादीत एकूण ४३ पंचनाम्यांची आणि ८६ पंचांची नोंद आहे.
न्यायाधीशांच्या परवानगीने पंचनाम्यांच्या यादीची एक प्रत संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनाही देण्यात आली. ॲड. पटवर्धन यांनी सरकारी वकिलांची पंचनाम्यांची यादी अमान्य केल्यास प्रत्येक पंचनाम्यावर सुनावणी होऊन पंचांची साक्ष होईल, अशी माहिती सरकारी वकील राणे यांनी दिली. सुनावणीसाठी एसआयटीच्या पथकासह एटीएसचे अधिकारी प्रकाश अवघडे यांचे पथक, दिलीप पवार आदी उपस्थित होते.
पंचनाम्यांची मोठी यादीसरकारी वकिलांनी सादर केलेल्या यादीत गुन्ह्याचे ठिकाण, कॉम्रेड पानसरे यांच्या शरीरातील गोळ्या, त्यांच्या कपड्यांची जप्ती, मृतदेहाचा पंचनामा, संशयित आरोपींची अटक, घरझडती, संशयितांनी दाखवलेली ठिकाणे, जप्त केलेल्या वस्तू, सीसीटीव्ही फुटेज... अशा एकूण ४३ पंचनाम्यांचा समावेश आहे.ॲड. निंबाळकर हजर राहणारपुढील सुनावणी सात फेब्रुवारीला होणार असून, त्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ॲड. शिवाजीराव राणे यांनी दिली.
संशयित समीरचा अर्जजामिनावर सुटलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या पायावर शस्त्रक्रिया करायची आहे. समीर हा गंभीर गुन्ह्यातील संशयित असल्यामुळे खासगी डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास तयार नाहीत. अखेर वकिलांच्या विनंतीनुसार सांगलीतील एक डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी तयार झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर समीरला घराबाहेर पडता येणार नसल्याने त्याला एसआयटीकडील दर रविवारच्या हजेरीत दोन महिने सवलत मिळावी, असा विनंती अर्ज समीरचे वकील पटवर्धन यांनी केला.