कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांवर कॉँग्रेस पक्षाने दावा केला असून, हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिकपणे कॉँग्रेसचे असून, या ठिकाणी निष्ठावंत तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, असा ठराव सोमवारी झालेल्या कोल्हापूर जिल्हा व शहर कॉँग्रेस समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण होते.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आढावा तसेच नजीकच्या काळात विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्याकरिता ही बैठक घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीकरिता वापरलेल्या ईव्हीएम मशीनबाबत यावेळी शंका उपस्थित करण्यात आली. ईव्हीएमला विरोध करून विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.कॉँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी याच्या अथक प्रयत्नांबद्दल आभार मानून त्यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. संसदीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल खासदार सोनिया गांधी यांचे अभिनंदन करण्यात आले.बैठकीस प्रल्हाद चव्हाण यांच्यासह महंमद शरीफ शेख, संपतराव पाटील, विजयसिंह माने, प्रदीप चव्हाण, किरण मेथे, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, हेमा लुगारे, स्मिता माने, एस. के. माळी, पार्थ मुंडे, दीपक थोरात, बाळासाहेब निंबाळकर, रंगराव देवणे, मतीन शेख, बाळासाहेब जगदाळे, रशीद ढालाईत, यशवंत थोरात, अशोक गायकवाड, आनंदा पाटील, उदय चव्हाण, रणजित पोवार, आकाश शेलार, उपस्थित होते. ए. डी. गजगेश्वर यांनी प्रास्ताविक केले; तर किशोर खानविलकर यांनी आभार मानले.