ज्योतीप्रसाद सावंत --आजरा --अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. निमित्त वाढदिवसाचे असले तरी अशोकअण्णांसह व्यासपीठावरील मंडळींची भाषणे पाहिली असता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराचा प्रारंभ झाला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.गतसाली आजरा कारखान्याच्या जोडण्यांना अण्णांच्या वाढदिवसानेच सुरुवात झाली होती. यावर्षी समोर जि.प. व पं. स. निवडणूक आहे एवढाच फरक . जिल्हा बँक, आजरा कारखान्यातील यशानंतर महाआघाडीत चांगलेच चैतन्याचे वातावरण आहे. एकीकडे महाआघाडी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असताना आजरा कारखान्याची सत्ता गेल्यामुळे विरोधक थोडेसे बॅकफूटवर आले आहेत. वास्तविक, साखर कारखाना निवडणूक व जि. प. व पं. स. निवडणुका यामध्ये बराच फरक आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्यचे मतदारही वेगळी गणिते; परंतु तीन महिन्यांपूर्वीच अशोकअण्णांनी जि. प. व पं. स. निवडणुकांचे रणशिंग फुंकून विरोधकांना इशारा दिला आहे. प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आता इच्छुकांची संख्या वाढणार हे स्पष्ट आहे. महाआघाडीची सर्वपक्षीय मोट भक्कम झाली असताना राष्ट्रीय काँगे्रसची मात्र पडझड झाली आहे. राष्ट्रीय काँगे्रसमधील प्रमुख मंडळी ऐन निवडणुकीत व पक्षाच्या गरजेच्या वेळी पक्षविरोधकांच्या छावणीत दाखल होताना दिसतात. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना पहावयास मिळते. राष्ट्रवादीकडे बऱ्यापैकी सत्तास्थाने आहेत, पण कारखाना निवडणुकीनंतर या पक्षाचे वरिष्ठ प्रतिनिधी नेते तालुक्यात फिरकलेलेच नाहीत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी काँगे्रस-राष्ट्रवादीने मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. अन्यथा आगामी निवडणुकांत उमेदवारीसाठी उमेदवार मिळतानाही अडचणी होणार आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय नेत्यांना पुन्हा एकवेळ अशोकअण्णांनी थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.माजी आमदार महादेवराव महाडिक, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार राजू शेट्टी, आदींनी त्यांना रसद पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकंदरच महाआघाडीच्या मागे मोठी ताकद उभी राहणार आहे. सर्व चित्र समोर असतानाही विरोधक याकडे सहज पाहत असतील तर तो केवळ आत्मघातकी निर्णय ठरल्याशिवाय राहणार नाही. कारखान्याची पुनरावृत्ती होणार की यावेळी काँगे्रस राष्ट्रवादी नव्याने राजकीय डावपेच आखणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला
By admin | Published: November 17, 2016 12:01 AM