कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा व पोलिस प्रशासन सज्ज आणि सतर्क आहे; आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी भरारी पथकांसह इतर पथके कार्यरत केली आहेत. सायबर सेल, बॅँका यांची मदत घेवूनही उमेदवारांवर अंकुश ठेवला जाणार आहे, त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. यानंतर सहारिया हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक नंदकुमार काटकर, अजित पवार, आदी उपस्थित होते. सहारिया म्हणाले, उमेदवारांनी निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, निवडणूक यंत्रणेने सर्वांना समान वागणूक द्यावी तसेच आचारसंहितेचे कशाही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदारांवर दबाव टाकणे तसेच प्रलोभन दाखविणाऱ्या प्रवृत्तींवर पोलिस दलाने आणि निवडणूक यंत्रणेने अंकुश ठेवावा. यासाठी आचारसंहिता कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा. जिल्ह्यात येणारी खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स व रेल्वेंची तपासणी निवडणूक यंत्रणेने करावी. भरारी पथकाबरोबरच स्थिर सर्वेक्षण पथकेही आवश्यकतेनुसार वाढवावीत. निवडणूक संबंधाने तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सोशल मीडियावर असलेल्या जाहिराती व पोस्टबाबत आचारसंहिता कक्षाने तसेच सोशल मीडियासाठी नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय पथकाने दक्ष राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात; तसेच सोशल मीडियासाठी नेमलेल्या पथकामध्ये सायबर सेल प्रतिनिधीचाही समावेश करावा. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडीओ पथके, चेक पोस्ट, इत्यादी प्रकारच्या उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. निवडणूक काळात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांची मदत घ्यावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करून त्या ठिकाणी जास्तीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज कराव्यात व नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करावी, आदी सूचना त्यांनी दिल्या. विविध पथके कार्यरत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रण कक्ष, ४० भरारी पथके, ३९ स्थिर सर्वेक्षण पथके, ५६ व्हीएसटी पथके आणि १४ व्हीव्हीटी पथके याबरोबरच पेड न्यूज, जाहिरात प्रसारण, सोशल मीडिया तसेच खर्च तपासणी पथके कार्यरत केली आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. २२ उमेदवारांशी साधला सहारियांनी संवाद राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी करवीर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहातील बैठक आटोपून सहारिया यांनी शेजारी करवीर निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी प्रक्रियेबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी बाहेर येऊन उमेदवारांशीही संवाद साधत, निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा करून काही अडचण आहे का? याबाबत विचारणा केली. ‘जातपडताळणी’बाबत उल्लंघन केल्यास कारवाई निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून उभे राहिलेल्या उमेदवारांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईलच, अशी माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.राज्यातील जवळपास ४५० नगरसेवकांनी प्रमाणपत्रच वेळेत सादर केलेले याबाबत सहारियांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, वेळेत प्रमाणपत्र सादर न केलेल्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल. कोल्हापूर महापालिकेचे २० नगरसेवक सर्वाेच्च न्यायालयात गेल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. जातपडताळणी प्रमाणपत्राचा विषय फार गुंतागुंतीचा व मोठा आहे. त्यामुळे आपण यामध्ये लक्ष घालून याचा आढावा घेऊ, असे त्यांनी सांगितले.
आचारसंहिता कक्ष २४ तास कार्यरत
By admin | Published: February 06, 2017 1:04 AM