कोल्हापूर : शाहूवाडीतील अणुस्कुरा येथे सापडलेली नाणी पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असून, नाण्यांबद्दलचा सविस्तर अहवाल तहसीलदारांकडून पुरातत्त्वला पाठविण्यात आला आहे.
संचालकांच्या सूचनेनुसार ही नाणी पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई, पुणे किंवा कोल्हापुरातील कार्यालयात जमा केली जातील. पुरातत्त्वकडे नाणी जमा झाली की त्यांचा इतिहास, कालखंड, मूल्य असा सविस्तर अभ्यास केला जाईल.अणुस्कुरा येथे विनायक पाटील यांच्या शेतात बुधवारी नांगरणीचे काम सुरू असताना बहामनी काळातील नाणी सापडली आहेत. या ७१६ नाण्यांमध्ये सोने, चांदी व तांब्याच्या नाण्यांचा समावेश आहे.
विनायक पाटील यांनी नाणी सापडल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास कळविल्यानंतर प्रांताधिकारी अमित माळी व तहसीलदार गुरू बिराजदार यांनी घटनास्थळी जाऊन सापडलेल्या जागेचा पंचनामा केला. ही नाणी सध्या शाहूवाडीच्या ट्रेझरीत ठेवण्यात आली आहेत.तहसीलदारांनी या नाण्यांबाबतचा सविस्तर अहवाल गुरुवारी तातडीने पुणे येथे पुरातत्त्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाने यांच्याकडे पाठविला आहे. तेथून तो मुंबई येथील मुख्य कायार्लयात संचालकांकडे पाठविण्यात येईल. पुढे संचालकांच्या आदेशानुसार ही नाणी राज्य विकास निधी अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येतील.लॉकडाऊनमुळे अडचणराज्यात कुठेही अशी प्राचीन नाणी आढळली की स्थानिक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात ती मुंबई येथील पुरातत्त्वच्या कार्यालयात जमा केली जातात. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यात मुंबई-पुणे रेड झोनमध्ये असल्याने तेथे जाणे धोकादायक असणार आहे. त्यामुळे या परिस्थितीत नाणी मुंबई-पुण्याला पाठवायची की कोल्हापुरातीलच पुरातत्त्वच्या कार्यालयात जमा करायची यावर पुढील दोन ते तीन दिवसांत संचालक निर्णय घेऊ शकतील, अशी माहिती सहायक संचालक विलास वहाने यांनी दिली.