प्रवीण देसाई -- कोल्हापूर --केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेला जिल्ह्यातील आमदारांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. निम्म्या आमदारांनीच गावांची नावे कळविली आहेत. त्यातही काहींनी सर्व, तर काहींनी एकाच गावाचे नाव कळविले आहे.सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्यासंदर्भात शासनाने २० मे २०१५ ला अध्यादेश काढला. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी याबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार १५ आॅगस्टपूर्वी आमदारांनी तीन गावांची नावे कळविणे अपेक्षित होते. याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे आठवड्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन यासंदर्भात उपस्थित आमदारांना आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीही गावांची नावे लवकरात लवकर कळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहा आमदारांनीच नावे कळविली आहेत. मुंबईचे शिवसेनेचे आमदार व शाहूवाडीचे सुपुत्र रमेश लटके यांनी शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव निवडले आहे. त्यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाला त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. कोल्हापूर शहरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हातकणंगले तालुक्यातील तासगावची निवड केली आहे.आमदारांनी एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ता आमचे गाव का निवडले नाही? अशी विचारणा करतो. त्यामुळे कुणाला सांभाळायचे आणि कुणाला दुखवायचे, अशी पंचाईत होते. कारण दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील निम्म्या आमदारांनीच जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे त्यांनी निवडलेल्या गावांची नावे कळविली आहेत. त्यालाही पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतरच गती आली आहे. आतापर्यंत सात आमदारांनी कळविलेल्या गावांची नावे नियोजन समितीकडून राज्याच्या ग्रामविकास विभागाला कळविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदारांनी निवडलेली गावेशिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, बुबनाळ, घालवाड ही गावे निवडली आहेत. इचलकरंजीचे आ. सुरेश हाळवणकर यांनी चंदूर (ता. हातकणंगले), गडहिंग्लजच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा), हातकणंगलेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी किणी, लक्ष्मीवाडी व माणगाव (ता. हातकणंगले), कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर यांनी तासगाव (ता. हातकणंगले), राधानगरी-भुदरगडचे आ. प्रकाश आबिटकर यांनी धामोड (ता. राधानगरी), मुंबईचे आ. रमेश लटके यांनी येळवण जुगाई (ता. शाहूवाडी). आमदारांकडून सावध पावले...एका बाजूला विधानसभा मतदारसंघातील गावांची संख्या जास्त, त्यातील तीनच गावे निवडायची आणि त्याचा विकासही या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र निधी नसल्याने आपल्याला मिळणाऱ्या आमदार निधीतूनच करायचा. त्यामुळे ही गावे निवडताना ती अनिच्छेनेच निवडली आहेत काय? असे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. गाव निवडताना समतोल राखताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांकडून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.
‘आदर्श ग्राम’साठी जिल्ह्यातील आमदारांचा थंडा प्रतिसाद
By admin | Published: September 12, 2015 12:31 AM