कोल्हापूर : उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून कोल्हापुरातही थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशापर्यंत खाली घसरला आहे. हे तापमान चालू हंगामातील नीच्चांकी ठरले आहे. गेल्या वर्षी याचदिवशी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके होते. पारा घसरल्याने जनजीवन गारठले असून दुपारचे ऊन उबदार शालीसारखे वाटत आहे. या महिनाअखेरपर्यंत कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून अख्खा उत्तर भारत थंडीचा प्रकोप अनुभवत आहे. कोल्हापुरातही गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुनरागमन झाले, पण म्हणावी तशी तीव्रता नव्हती. मात्र, चार दिवसांपासून अचानक कडाका वाढू लागला. रविवार, सोमवारी तर थंडीने कहरच केला. दिवसभर झोंबणारे वारे आणि रात्री कापरे भरवणाऱ्या या थंडीमुळे अवघे जनजीवनच गारठून गेले.
संध्याकाळी पाचपासूनच अंगात कापरे भरण्यास सुरुवात होते. सकाळी दहा वाजेपर्यंत थंडी कायम राहते. दुपारी उन्हामुळे तीव्रता कमी वाटते. मंगळवारीदेखील हीच परिस्थिती कायम राहिली. थंडीचे दिवस सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कोल्हापूरचा पारा १२ अंशापर्यंत खाली गेला आहे. यामुळे संपूर्ण कोल्हापूर गारठून गेले आहे.