लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॅाकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गणनेचे काम सुरू करण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी व नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळी यांनी सोमवारी केले.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेचे काम हाती घेण्यात येत आहे. या गणनेद्वारे देशामध्ये कार्यरत सर्वप्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती गोळा करण्यात येते. आतापर्यंत सहा आर्थिक गणना झाल्या असून शेवटची गणना २०१३ मध्ये झाली. यंदा गणनेमध्ये सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लि. व राज्य शासन यांचा सहभाग असणार असून त्यात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही गणना तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
गणनेची कालबद्ध अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालाप्रमाणे ग्रामीण भागात २६७ ग्रामपंचायती व शहरी ४० आयव्हीमध्ये अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे हे काम थांबविण्यात आले होते. शहरी भागात काम करताना नागरिक माहिती देण्यास नकार देत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपायुक्तांना या कामात सहकार्य करण्याबाबत सूचित करून सीएससीला वॉर्ड ऑफिसर यांच्याशी समन्वय साधून कामास सुरुवात करण्याबाबत निर्देश दिले.
---
इंदुमती गणेश