राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच गुऱ्हाळमालकांसमोर आहे. यंदाच्या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.‘कोल्हापुरी चप्पल’, ‘कोल्हापूर पद्धतीचा बंधारा’ याबरोबरच कोल्हापूरची आणखी ओळख म्हणजे ‘गूळ’ आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी येथे गुळाची बाजारपेठ वसविली आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिले. कोल्हापूरची माती आणि पाण्यामुळे येथील प्रत्येक शेतीमालाला वेगळी चव आहे. येथील कणीदार गुळाची चव काही औरच असते. त्यामुळे गुजरातसह देशातील अनेक बाजारपेठांत कोल्हापुरी गुळाला मागणी आहे.
काळाच्या ओघात साखर कारखाने उभे राहू लागल्याने गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत गेली. गुळाचा अनिश्चित दर आणि साखर कारखान्यांमधील ऊसदराच्या स्पर्धेमुळे गुऱ्हाळघरे मोडकळीस आली. सध्या जिल्ह्यात १५०-२०० गुऱ्हाळघरे सुरू आहेत.
यांपैकी सर्वाधिक गुऱ्हाळघरे करवीर, पन्हाळा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत आहेत. वर्षाला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २५ लाख गूळ रव्यांची आवक होते. उसाची वाढलेल्या ‘एफआरपी’च्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक साखर कारखान्यांकडे वळले आहेत.यंदा अतिवृष्टी व महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा फटका बसला असून, त्यामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाजानुसार ७५ हजार हेक्टरांवरील ऊसपीक पुराच्या पाण्याखाली सापडले असून, यापैकी २२ हजार हेक्टर ऊस गुऱ्हाळघराकडे येतो. त्यामुळे आगामी हंगामात किमान सात लाख गूळ रव्यांचे (३० किलो) उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर गुऱ्हाळघरांचीही पडझड झाली असून, जळणाच्या गंज्या (बडम्या) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हंगाम कसा सुरू करायचा, असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे.चिखली परिसरातील चिमण्या थंडावणारप्रयाग चिखली, वडणगे, वरणगे, निगवे दुमाला, पाडळी बुद्रुक परिसरांत सर्वाधिक गुऱ्हाळघरे आहेत; पण महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त झाल्याने यंदा या भागातील गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटण्याची शक्यता धूसर बनली आहे.उत्पादनाबरोबर प्रतीला फटकागुळाचे उत्पादन घटणार आहेच; त्याशिवाय पुरात सापडलेल्या उसामुळे गुळाची गोडी आणि रंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
पुराच्या पाण्याने ऊस कुजला आहे. गुऱ्हाळघरांचे नुकसान झाल्याने हा उद्योग उभा राहणे अवघड आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी.- हिंदुराव तोडकर,गुऱ्हाळमालक, वाकरे
महापुरामुळे यंदा गुळाचे उत्पादन घटणार हे निश्चित आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आढावा घेऊन हंगामाची तयारी केली जाईल.- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती